सोलापूर – मरिआई चौक ते भैच्या चौक मार्गावरील रेल्वे ब्रिजचे पाडकाम करण्यापुर्वी ये – जा करणाऱ्या वाहनांना सक्षम पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा अन्यथा दमाणी नगरचा रेल्वे पूल पाडू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुहास कदम यांनी दिला.
मरिआई चौक ते भैय्या चौक दरम्यान असणारे ब्रिटीशकालीन रेल्वे पुल पाडकामाबाबत रेल्वे प्रशासन व सोलापूर महानगरपालिका यांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे. परंतू सदर ब्रिजवरून हजारो वाहनांची वाहतूक होते. विशेषतः तो मार्ग सोलापूर ते मंगळवेढा, कोल्हापूर हा मुख्य मार्ग म्हणून ओळखला जातो. सलगरवस्ती, दमाणी नगर, थोबडेवस्ती, देगांव व आजू बाजूला असलेले खेडेगांवा मधील नागरीक या पुलावरून वाहतूक करतात. तसेच शाळकरी विद्यार्थी देखील या मार्गाने ये – जा करीत असतात त्यामुळे रेल्वे ब्रिजचे काम सुरू होण्यापुर्वी दोन्ही बाजुने सक्षम पर्यायी वाहतूक व्यवस्था होण्याकरिता मार्ग उपलब्ध करावेत, जेणेकरून अपघात व पोलीस प्रशासनावरचा ताण कमी होईल. महत्वाची बाब म्हणजे रेल्वे ब्रिजचे काम सुरू होत असताना पर्यायी मार्गावर वाहतूक नियंत्रण शाखेने अतिरिक्त वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचारी नेमणूक करावी जेणे करून वाहतूक सुरळीत होईल अशी मागणी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त गोहर हसन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचे चंद्रकांत पवार, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार आदी उपस्थित होते.
आज तीव्र आंदोलन करणार
दमानी नगरचा पुल हा बंद करण्यात येणार आहे. या मतदारसंघातील आमदारांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा चंद्रकांत पवार यांनी दिला.
महिलांनी येथून प्रवास कसा करावा
पर्यायी मार्गावरती लाईटची व्यवस्था नाही. एक वर्ष हा पूल बंद असणार आहे. महिलांनी येथून प्रवास कसा करावा. त्यामुळे सक्षम पर्यायी व्यवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पूल पाडू देणार नसल्याची भूमिका माऊली पवार यांनी व्यक्त केली.


















