रामटेकमधील उमेदवाराने कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवावी, असं नागपूर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे म्हणाले.
लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना आता काही जागांवरुन महायुतीत रस्सीखेच सुरु झाल्याचं चित्र आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्या रामटेक लोकसभा मतदारसंघावर भाजपची नजर असल्याचं चित्र आहे. कारण रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ‘कमळ’ चिन्हावर लढली जावी, अशी मागणी भाजप जिल्ह्याध्यक्षांनीच केली आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघावर गेली दोन टर्म शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. त्याआधीही २००९ ते २०१४ चा अपवाद वगळता १९९९ पासून सलग दहा वर्ष शिवसेनेचाच खासदार होता. युतीत ही जागा कायम शिवसेनेकडे राहिली होती. परंतु आता भाजपचा या जागेवर डोळा असल्याचं दिसत आहे.
रामटेकमधील उमेदवाराने कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवावी, रामटेकची जागा भाजपला मिळावी ही माझी मागणी असल्याचं नागपूर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे म्हणाले. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यात रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.