तभा फ्लॅश न्यूज/बार्शी : श्रीभगवंत मंदिर, बार्शी येथे सुरु असलेल्या श्रावणमास प्रवचनमालेच्या पूजनीय श्रीगुरु डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी ‘श्रीमद्भागवत कथा चिंतन’ या विषयावर भावपूर्ण निरुपण करताना श्रवणाबरोबर मननाचेही अत्यंत महत्त्व विशद केले. ते म्हणाले, ‘फक्त श्रवण करुन भागत नाही, तर त्यासोबत मनन करणेही तितकेच आवश्यक आहे. कारण श्रवण आणि मननाच्या द्वारेच खरे ज्ञान प्राप्त होते आणि हाच ज्ञानाचा प्रकाश जीवाला मोक्षाकडे नेतो.’ परंतु हे ज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी विवेकाचे अस्तित्व अनिवार्य आहे. विवेक म्हणजेच सार–असाराचे भान, जे ज्ञानाच्या प्राप्तीचा मूलाधार ठरतो.
महाराज पुढे सांगतात, ‘श्रवण सर्वजण करतात, पण मनन सर्वच करत नाहीत.’ श्रीमद्भागवत श्रवण करताना त्या कथेचे श्रवण, मनन आणि निदिध्यास या त्रिसूत्री प्रक्रियेतूनच आत्मिक उन्नती शक्य होते. भागवत महात्म्यात धुंधुकारीचे उदाहरण दिले आहे. तो पापी असूनही भागवत कथा ऐकून त्याने मनन केले, म्हणूनच मोक्षास पात्र ठरला. त्यामुळे श्रवणाबरोबर मनन करणाऱ्यालाच मुक्ती प्राप्त होते, हे भागवत तत्वज्ञान स्पष्ट करते.
डॉ. जयवंत महाराज मार्गदर्शन करताना सांगतात, “श्रवण करताना सर्व इंद्रियांनी त्याचे आश्रय घेतले पाहिजे. तेव्हाच ‘कथामृत’ रसाचे खरे सेवन होऊ शकते.” लक्षपूर्वक श्रवण आत्महिताची बीजे रोवते, जीवनात साक्षात पूर्णत्व निर्माण करते आणि जीवाच्या हृदयात शाश्वत आनंदाचे झरे उगम पावतात. हीच आहे मननयुक्त श्रवणाची अपूर्वाई, जी महाराज भाविकांपुढे नेमकेपणाने उलगडतात. “जे ज्ञान चित्तामध्ये दृढ होत नाही, ते व्यर्थ; प्रमादपूर्वक केलेले श्रवण व्यर्थ; संशयभावनेतून केलेले मंत्रपठण निष्फळ आणि चंचल चित्ताने केलेला जप देखील निष्फळ ठरतो.” या सिद्धांतांचा विस्तार डॉ.जयवंत महाराज विविध उदाहरणांच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहोचवतात.
श्रवण करताना काय भाव अपेक्षित आहेत? याचे वर्णन करताना ते सांगतात. गुरुवाक्यावर पूर्ण विश्वास असावा, स्वतःत दीनता असावी, मनातील दोषांवर विजय मिळवावा आणि कथा ऐकताना बुद्धी स्थिर ठेवावी. कैमुत्तिक न्यायाने त्यांनी एक सुंदर दृष्टांत दिला “जर निर्जीव बांबूच्या गाठी भागवत श्रवणामुळे सुटू शकतात, तर चेतन जीवाच्या अंतरंगात असलेल्या अज्ञानाच्या गाठी सुटणार नाहीत का?” या दृष्टांतातून भागवत कथा ही अज्ञानाच्या गाठी सोडणारे प्रभावी साधन आहे, हे अधोरेखित होते.
त्यांनी धर्मराज आणि भगवान विष्णू यांच्यातील संवादाचे उदाहरण दिले. धर्मराज भगवंताला म्हणतात. ‘हे प्रभो! मी पापक्षालनासाठी तीर्थयात्रेला जात आहे.’ त्यावर भगवंत त्याला कडुलिंबाची एक छोटी काडी देतात आणि सांगतात – ‘स्नान करताना ती देखील बुडव.’ तीर्थयात्रेनंतर परतल्यावर भगवंत विचारतात – ‘कडुलिंबाची चव बदलली का?’ धर्मराज म्हणतो – ‘नाही, ती अजूनही कडूच आहे!’ या उदाहरणातून महाराज स्पष्ट करतात की, परमार्थामध्ये केवळ कृती नव्हे तर त्यामागची भावना देखील शुद्ध असली पाहिजे.
चित्तातील संस्कार हेच माणसाच्या वर्तनातून प्रकट होतात. आहार, वावरण्याचे वातावरण, संस्कृती आणि समवेत असलेली ऊर्जा यांचा परिणाम चित्तावर होतो. आणि हेच चित्त शुद्ध करण्याचे कार्य श्रीमद्भागवत कथा करते. म्हणून ही कथा हे ‘कथातीर्थ’ आहे – जे शरीर नव्हे तर चित्त आणि मनाचे स्नान घडवते.
तीर्थांत शरीराचे स्नान होते, पण भागवत कथारुपी तीर्थात मनाचे शुद्धिकरण होते. हेच शुद्ध मन जीवाला मुक्तीकडे नेतं. पण यासाठी आपणाला त्या भागवत कथारुपी तीर्थामध्ये मनोभावे स्नान करणे आवश्यक आहे. असा हा भागवत चिंतनाचा अमृतमय गंगा प्रवाह जो जीवाला परिपक्व करतो, विवेक जागवतो आणि मुक्तीकडे घेऊन जातो. डॉ. जयवंत महाराज बोधले यांचे आजच्या सत्रातील मार्गदर्शन आत्मदर्शनाची वाटचालीसाठी पूरक होते.
Post Views: 20