सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वंदे भारत एक्सप्रेसने १० फेब्रुवारी २०२६ रोजी आपल्या समर्पित सेवेची तीन वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत, जी आधुनिक रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे.
९ फेब्रुवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. भारताची अर्थिक राजधानी मुंबई तसेच कापड आणि हुतात्म्यांचे शहर सोलापूर यांच्यात जलद आणि जागतिक दर्जाची रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही देशातील ९ वी वंदे भारत एक्सप्रेस होती.
ट्रेन क्रमांक २२२२६/२२२२५ सोलापूर-सीएसएमटी मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ४५५ किमी अंतर फक्त ६ तास ३० मिनिटांत पूर्ण करते, तर सध्याच्या सुपरफास्ट सेवांमध्ये ७ तास ५५ मिनिटांत पूर्ण होते, ज्यामुळे प्रवासाच्या वेळेत अंदाजे १ तास ३० मिनिटांची बचत होते. सध्या, ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावते आणि कुर्डुवाडी, दौंड, पुणे, कल्याण, ठाणे आणि दादर येथे थांबते.
सुरुवातीला १६ डब्यांच्या वंदे भारत ट्रेन सेटसह सुरू करण्यात आलेल्या या सेवेला प्रवाशांची प्रचंड मागणी होती, ज्यामुळे ऑगस्ट २०२५ मध्ये ही सेवा २० डब्यांच्या रेकपर्यंत वाढवण्यात आली. सध्या, ट्रेनमध्ये एकूण १,४४० आसन क्षमता आहे, ज्यामध्ये १,३३६ चेअर कार (सीसी) सीट्स आणि १०४ एक्झिक्युटिव्ह चेअर कार (ईसी) सीट्स आहेत.
ट्रेनची प्रचंड लोकप्रियता तिच्या उल्लेखनीय कामगिरीतून दिसून येते, जानेवारी २०२६ पर्यंत एकूण १०२.२७% ॲाक्युपन्सी सह २३,४३,५९८ प्रवाशांनी प्रवास केला. सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या तीन यशस्वी वर्षांच्या सेवेची पूर्तता ही भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरण, प्रवाशांच्या सोयी, वेग, सुरक्षितता आणि शाश्वत वाहतुकीच्या प्रतिबद्धतेचा पुरावा आहे, त्याचबरोबर प्रादेशिक विकास आणि राष्ट्रीय कनेक्टिव्हिटीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.























