लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नती होणार आहे. त्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पुण्याच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड व कादर शेख यांच्या नावाची चर्चा आहे. दुसरीकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून वर्ध्याचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप येतील, असेही बोलले जात आहे. या ८ दिवसांत त्यासंबंधीचे आदेश निघतील, अशी माहिती आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकल्यापासून १ नोव्हेंबर २०२२ पासून या विभागाला अद्याप पूर्णवेळ अधिकारी मिळालेला नाही. लोहार यांच्यानंतर उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी तब्बल एक वर्ष या विभागाचा कारभार व्यवस्थित हाताळला. त्यानंतर महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी प्रभारी म्हणून या विभागाचा चांगला कारभार केला. आता तृप्ती अंधारे यांच्याकडे या विभागाचा पदभार असून त्यांच्याही कामावर विभागातील कर्मचारी खूष आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणूनही त्यांनी शालार्थ आयडी, संच मान्यता, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन अशी कामे व्यवस्थितपणे पार पाडली आहेत. पण, १५ महिन्यांपासून प्रभारींवर चालणाऱ्या या विभागाला आता लोकसभा आचारसंहितेपूर्वी पूर्णवेळ अधिकारी मिळेल, अशी आशा आहे. दरम्यान, पुण्याच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी सोलापूरला नकार दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सोलापूर महापालिकेचे तत्कालीन प्रशासनाधिकारी कादर शेख यांच्याकडे प्राथमिकची जबाबदारी येईल, अशीही चर्चा आहे.