भोकरदन येथे आढावा बैठकीत खासदार डॉ.काळे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
भोकरदन : नगर परिषद मंगल कार्यालय भोकरदन येथे जालना जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार डॉ.कल्याण काळे यांनी भोकरदन तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तसेच सर्व शासकीय कार्यालयाच्या प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक घेतली. तालुक्यातील नागरिकांना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व बेजबाबदार कृत्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयांचे वारंवार उंबरठे झिजवावे लागत असून वेळेवर काम होत नसल्याने हाल होत असून तालुक्यातील जनता त्रस्त आहे.
याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार डॉ. कल्याण काळे यांनी सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रमुख अधिकारी व विभाग प्रमुखांची विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये विहिरींच्या कामांना तात्काळ मंजुरी द्या, वाळूचे साठे जप्त करण्यासाठी कमिटी स्थापन करा, योजनांची अंमलबजावणी पूर्ण करा, सर्व कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी यांनी कार्यालयात वेळेवर पूर्ण वेळ हजर राहावे, अशा सूचना भोकरदन येथील नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत खासदार काळे यांनी
संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी भोकरदन मध्ये चालू असलेल्या गर्भपात रॅकेटवर भाष्य करत भोकरदनचे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गर्भपात प्रकरणी बदनाम होत आहे असे म्हटले.
या वेळी मा.आ.चंद्रकांत दानवे, नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, बबलू शेठ चौधरी, नवनाथ दौड, बोरसे गुरुजी, तहसीलदार संतोष बनकर, डी.वाय.एस.पी जी.एच दराडे, गटविकास अधिकारी गजानन सुरडकर, तालुका आरोग्य अधिकारी रघुवीर चंदेल, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा काथार यांची उपस्थिती होती.
खा.कल्याण काळे यांनी सर्व कार्यालयांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर शासनाच्या योजनांचा पुरेपूर लाभ पात्र लाभार्थ्यांना तात्काळ मिळवून देण्यात यावा, एमआरईजीएस अंतर्गत विहिरींच्या लाभासाठी आलेले सर्व प्रस्ताव तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात यावा, भोकरदन मध्ये सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे, असे अधिकारी व कर्मचारी यांना निर्देशित केले. यावेळी तालुक्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..