सोलापूर – 15 ते 20 वर्षापासून 54 मीटर रस्त्याचे काम प्रलंबित आहे. अवंती नगर, अभिमानश्री नगर, यश नगर, अरविंदधाम, निराळे वस्ती तसेच शेटे नगर, दमानी नगर परिसरातील नागरिकांची खूप मोठी गैरसोय होत आहे. येणाऱ्या काळात रेल्वे प्रशासन भय्या चौक येथील पूल कामासाठी बंद करणार आहे त्यामुळे पर्यायी मार्ग उपलब्ध करून घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे शहर समन्वयक लहू गायकवाड यांनी दिला.
गेल्या सहा महिन्यांपूर्वीच या रस्त्याला अडथळा होणाऱ्या जवळपास 10/15 घरांना महानगरपालिकेने काढले. अडथळा दूर झाला असला तरी रस्त्याचे काम मात्र पूर्ण करण्यास महानगरपालिका किंवा रेल्वे प्रशासन यांनी सुरवात केलेली नाही. येत्या दोन महिन्यात दमानी नगर येथील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन रेल्वे पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्या मार्गाची संपूर्ण वाहतूक या 54 मीटर रस्त्यावरून होईल. लवकरात लवकर 54 मीटर रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
याप्रसंगी शिवसेना शहर संघटक सुरेश जगताप, उपशहरप्रमुख दत्ता खलाटे, विभाग प्रमुख आबा सावंत, तुषार खंदारे, बाळासाहेब माने, निरंजन बोद्दुल, वैशाली सातपुते, बाळासाहेब सातपुते आदी उपस्थित होते.

















