तळणी / जालना :- मंठा तालुक्यातील उस्वद येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे गुंडगिरी व गावातील शांतता भंग झाली असून, महिलांपासून तरुणांपर्यंत सर्वच घटक या त्रासाला कंटाळले आहेत. अवैद्य दारू विक्री आळा घालावा, दोषींवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत उस्वदने ८ डिसेंबरच्या ग्रामसभेत सर्वानुमते ठराव करून पोलीस प्रशासनाला ता.९ रोजी निवेदन सादर केले.
गावातील सरपंच कमल उद्धव सरोदे तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने परतुर येथील विभागीय अधिकारी कार्यालय व मंठा पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात गंभीर परिस्थितीची नोंद करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अनेक दिवसांपासून गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असून, या दारूच्या आहारी गेलेले काही तळीराम खुलेआम रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत फिरत आहेत. यामुळे गावातील महिलांना व शाळकरी मुलींना रस्त्यावरून जाणे कठीण झाले असून, त्यांच्या दिशेने शिवीगाळ, अर्वाच्य भाषेतील टिप्पणी, धमक्या देणे, अंगावरील कपडे काढून फिरणे अशा विटंबनास्पद घटना घडत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
अवैध दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, तरुणांचे संसार कोलमडले, कुटुंबांत भांडणे, हिंसाचार, घरगुती कलह वाढल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. गावातील काही गुंड प्रवृत्तीचे लोक चाकू, फोयता, सुरा यांसारखी खूनकारक शस्त्रे घेऊन रस्त्यावर फिरत असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
“कोणी चांगले बोलण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना धमक्या दिल्या जातात. गावात अवैध दारू मिळत असल्याने तरुणाई चुकीच्या मार्गावर जात आहे,” असा सूर निवेदनात आहे.
ग्रामपंचायतीने परिस्थितीचा आढावा घेत ग्रामसभेत ठराव करून अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी सफाईने मांडली. ठरावाची प्रत मंठा पोलीस प्रशासनास देण्यात आली असून तातडीने कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.
नागरिकांनी मंठा पोलीस ठाण्याने या प्रकरणी तत्परतेने हस्तक्षेप करून दोषींवर कडक गुन्हे दाखल करावेत, गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावी आणि गावकऱ्यांना दहशतीतून मुक्त करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
सदर निवेदनाची प्रत मा. विभागीय पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर मा. जिल्हाधिकारी, जालना मा. पोलीस अधीक्षक, जालना मा. नामदार बबनराव लोणीकर, आमदार परतूर–मंठा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, परतूर
गावकऱ्यांचा एकच सूर — “गावातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे; अवैध धंद्यांवर तातडीने गंडांतर आणा.”


















