जम्मू, 02 सप्टेंबर (हिं.स.) : जम्मू-काश्मिरातील सुंजवा सैन्य तळावर आज, सोमवारी सकाळी 11 वाजता जिहादी दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यात सैन्याचा एक जवान जखमी झाला आहे. या हल्ल्याला लष्कराकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले. तसेच या हल्ल्यानंतर सैन्याने या संपूर्ण परिसराला वेढा घालून सर्च ऑपरेशन सुरू केलेय.
गेल्या काही दिवसांपासून जिहादी दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यासाबोतच जम्मू परिसरातही आपल्या कारवाया वाढवल्या आहेत. जम्मूच्या सुंजवा सैन्य तळावर 36 इन्फंट्री ब्रिगेड तैनात आहे. दहशतवाद्यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता अचानक या ठिकाणी हल्ला चढवला. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला लष्कराच्या जवानांनीही प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला. दहशतवाद्यांनी तळाजवळ तैनात असलेल्या लष्कराच्या जवानावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात जवान जखमी झाला, अशी माहिती संरक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितली. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कराने स्थानिक पोलिसांसह शोध मोहीम सुरू आहे. याआधी गुरुवारी, लष्कराने जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील मच्छल आणि तंगधर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा यशस्वीपणे खात्मा केला होता.