राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) तुतारीवाला माणूस हे चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना हे चिन्ह दिले असून शरद पवार गट आता या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. या आधी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं. आता चिन्हही बहाल केले आहे. पवार गटानेही आयोगाने दिलेले चिन्ह मान्य केले आहे.
याबाबत शरद पवार गटाकडून ट्वीट करत सांगण्यात आलं आहे की, “महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं, ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”
सोबतच पुढील पंक्तीही पोस्ट करण्यात आल्या आहे.
“एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!”
आमची युद्धाची तयारी सुरू झाली आहे – जितेंद्र आव्हाड
यावर प्रतिकिया देताना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तुतारी ही युद्धाची निशाणी आहे. यापुढे जो रणसंग्राम होणार आहे, त्याची तयारी करताना तुतारी वाजवली की लोक सोबत येतील. हे नकळत भाग्यात आलं आहे. युद्धाला वेळ काळ नसतो. आमचं चिन्ह थांबवावं, आमच्या पक्षाला नाव मिळू नये, म्हणून प्रयत्न झाले. मात्र काहीही झालं नाही. आम्हाला नावही मिळालं आणि चिन्हही मिळालं. हे चिन्ह इशारा देऊन गेलं, आमची युद्धाची तयारी सुरू झाली आहे. सोशल मीडियाच्या काळात हे चिन्ह घरोघरी पोहोचण्यासाठी वेळ लागणार नाही, असंही ते म्हणाले.
या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवारांना दिले होते. त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. तसेच पुढील आदेश देईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाचे पक्षाचे चिन्ह असणार आहे. तुतारीवाला माणूस या चिन्हावर शरद पवार गटाला यापुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शरद पवार गटाकडून कपबशी, वटवृक्ष आणि तुतारी असे तीन पर्याय देण्यात आले होते. यामधील ‘तुतारी’ हे नवीन चिन्ह बहाल करण्यात आले आहे.
दरम्यान शरद पवार गटाला मिळालेले नाव आणि चिन्ह दोन्ही कायम राहू शकतं, असं मत सर्वोच्च न्यायालयाचे वकील अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. शरद पवार गट न्यायालयात जाईल आणि आपल्याला मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम राहावं, अशीही भविष्यात कदाचित मागणी करू शकते, असे ते म्हणाले.