मंगळवेढा – कर्नाटक राज्यातून विठ्ठलाचा धावा घेत पंढरपूरकडे निघालेल्या एका 56 वर्षीय वारकर्याला भरधाव वेगात आलेल्या टिपरने मंगळवेढा – मरवडे मार्गावर जोराची धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक वारकरी जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली असून याप्रकरणी अज्ञात टिपर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी यातील जखमी फिर्यादी प्रकाश शिरसथळी (वय 45) हे व मयत ईश्वर शिवाप्पा पाणीगट्टी (वय 56 रा.धारवाड राज्य कर्नाटक) हे दोघे दि.30 रोजी सायं.6.15 वाजता मंगळवेढा ते मरवडे मार्गावरील पवार यांच्या वस्तीवर नाष्टा करून दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी पायी चालत जात असताना मंगळवेढयाकडून येणारा टिपर क्र.एम.एच.44 ए.डी.4411 याने भरधाव वेगात येवून दोघांना जोराची धडक दिल्याने यातील ईश्वर पाणीगट्टी हा गंभीर जखमी होवून जागीच मृत्यू झाला तर प्रकाश शिरसथळी हे जखमी झाले असल्याचे दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
या घटनेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात टिपरचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात करून टिपरचालक फरार झाला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान कर्नाटक राज्यातून विठ्ठलाच्या भेटीसाठी अतुर झालेले वारकरी मुखी विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर करत जात असतानाच ही दूर्दैवी घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कार्तिक वारीमुळे राज्याच्या कानाकोपर्यातून पंढरपूरकडे दिंडया येत असून वाहन चालक मात्र बेफिकीरपणे वाहने चालवत असल्याचा या घटनेवरून प्रकार उघड झाला आहे. त्या वाहनचालकाविरूद्ध सर्वत्र संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.















