ज्युडीशिअल डिस्ट्रिक्ट ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे कार्य कौतुकास्पद – जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश एम.एस.आझमी यांचे प्रतिपादन
शतकपूर्ती निमित्त रक्तदानासह वृक्षारोपण
त.भा.वृत्तसेवा
सोलापूर दि १३ जुलै – जिल्हा न्यायालय, सोलापूर येथील दि ज्युडीशिअल डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., सोलापूरला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली.
शतकपूर्ती महोत्सवानिमित्त सोसायटीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याची सुरुवात रक्तदान शिबिराने सुरुवात करून झाली. सदर रक्तदान शिबिर सोलापूर बार असोसिएशनच्या हॉलमध्ये संपन्न झाले. या रक्तदान शिबिराचे उदघाटन सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस.आझमी यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश ३ योगेश राणे, मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी , जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचीव यु. पी.देवर्षी हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आझमी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सोसायटीच्या कार्याचे कौतुक करत आर्थिक तसेच सामाजिक कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी सोसायटीचे चेअरमन तथा प्रबंधक पल्लवी पैठणकर यांनी देखील आपले मत व्यक्त करताना उपस्थित सभासदांना रक्तदानाचे आवाहन केले.
यावेळी सोसायटीचे चेअरमन तथा जिल्हा न्यायालय, सोलापूरच्या प्रबंधक पल्लवी पैठणकर, व्हाईस चेअरमन सुधिर क्षीरसागर, संचालक संजय म्याकलवार, प्रसाद चुंगे, मुकुंद ढोबळे, श्याम वलेकर, अजित पगड्याल, ज्ञानेश्वर लिंबोळे, नबीलाल शेख, संजय कारले, समिना शेख उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने न्यायालयीन कर्मचारी, विधिज्ञ यांनी स्वेच्छेने रक्तदान करण्याकरिता सहभाग नोंदविला. सदर रक्तदानाचे संकलन महात्मा बसवेश्वर ब्लड बँक , सोलापूरचे जनसंपर्क प्रमुख सोमनाथ बिराजदार यांनी केले.
दरम्यान प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम.एस.आझमी, जिल्हा न्यायाधीश -३ योगेश राणे, मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी , जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव यु. पी.देवर्षी, जिल्हा न्यायालय, सोलापूरच्या प्रबंधक तथा सोसायटी चेअरमन पल्लवी पैठणकर, सोसायटीचे सर्व संचालक यांनी जिल्हा न्यायालयाचे आवारात वृक्षारोपण केले.
तत्पूर्वी कार्यक्रमात सोसायटीचे संचालक संजय म्याकलवार यांनी सोसायटीच्या कार्याचा आतापर्यंतचा लेखाजोखा मांडत सोसायटीकडे सात कोटी रुपयांची ठेवी असून कोरोना काळात सोसायटीने योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांना निधी उपलब्ध करून दिला. सोसायटी आर्थिक तसेच सामाजिक कार्यात कार्य करत असल्याचे सांगितले. यावेळी विधीज्ञ न्यायालयाचे अधिकारी तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.