बार्शी – शहरातील १०० फुटी रोडवरील साई संजीवनी हॉस्पिटलशेजारील गांधी स्टॉप परिसरात एका भाड्याच्या घराचे कुलूप तोडून, अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन रोख रक्कम आणि चांदीचा ऐवज असा एकूण ३२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत चैतन्य अनिल सोनवणे (वय २८, मूळ रा. आदित्य संस्कृती सोसायटी, लातूर, सध्या उ/ड मंगेश मारुती येरोळकर, १०० फुटी रोड, बार्शी) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते गेल्या एका महिन्यापासून वरील पत्त्यावर एकटेच भाड्याने राहत आहेत. त्यांचे आई-वडील लातूर येथे राहतात. दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांनी घर बंद करुन सोलापूर व नंतर पुणे येथे कामानिमित्त गेले होते. दि.३० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता घरमालक मंगेश येरोळकर यांनी फोनवर कळविले की, त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले असून दरवाजा उघडा दिसत आहे. चोरट्यांनी कपाटाचे कुलूप तोडलेले होते आणि त्यात ठेवलेली ३०,००० रुपये रोख रक्कम, तसेच अंदाजे २,००० रुपये किमतीची दोन चांदीची नाणी चोरुन नेल्याचे आढळले. बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.





















