श्रीसंत मुक्ताबाईंच्या नावाने मंगेश महाराजांच्या शुभहस्ते वृक्षारोपण.
संतांच्या नावाने केलेल्या वृक्षारोपणाचे वारकरी व महाराजांनी केले कौतुक.
करकंब प्रतिनिधी :-करकंब येथे अनेक संतांच्या पालख्या २ दिवस मुक्कामी असताना लाखो वारकऱ्यांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी करकंबरांनी आनंदाने,उत्साहाने तन,मन,धनाने परिश्रम केले.विविध संतांच्या पालख्यांचे आगमन व स्वागतनिमित्ताने करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्यावतीने लेकीच्या झाडाबरोबरच संतांच्या नावे झाडे लावण्याचा उपक्रमही राबवण्यात आला.या उपक्रमाचे वारकरी,आणि महाराज मंडळी,कीर्तनकारांनी भरभरून कौतुक करत आशीर्वाद दिले.
या उक्रमाअंतर्गत श्रीसंत मुक्ताबाईंच्या नावाने वटवृक्षाचे श्रीसंत मुक्ताबाई श्रीराम पालखी सोहळ्याचे प्रमुख श्री.मंगेश महाराज यांचे शुभहस्ते रोपण करण्यात आले.यावेळी मंगेश महाराज यांनी अशा उपक्रमांची सध्या आवश्यकता असून सर्व गावांनी असा उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे मनोगत व्यक्त केले.
या उपक्रमासाठी त्यांनी ४००० रुपयांची देणगी दिली.निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे मोहन महाराज बेलापूरकर यांच्या हस्तेही श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या नावाने झाड लावले.यावेळी करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमचे संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे,हरिश्चंद्र वास्ते,नागेश खारे,विशाल बोधे,वारकरी आदी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.