तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : महायुती सरकारमधील भ्रष्ट व कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी आणि सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरुध्द जनतेला जागृत करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जनआक्रोश आंदोलन पुकारण्यात आले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलनाला प्रतिसाद लाभला.
शिवतीर्थावरून भ्रष्टाचार जाळून टाकणारी मशाल घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जा, आता चाय पे चर्चा नको…भ्रष्टाचारावर चर्चा होऊ द्या, असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले. महाराष्ट्राने पुढाकार घेतला तर येऊ घातलेल्या हुकूमशाहीविरोधात संपूर्ण हिंदुस्थान उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवाजी पार्क येथील मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर आयोजित जनआक्रोश आंदोलनात उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो आणि तो शिवसेनेतच आहे म्हणून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात भ्रष्टाचाऱ्यांविरुध्द शिवसेना रस्त्यावर उतरली आहे, असे सांगून ठाकरे यांनी,’ भ्रष्टाचाऱ्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय, या घोषणेचा धागा पकडून म्हणाले,’ मिंधे बिनडोक्याचे आहेत, त्यांना नुसते पाय आहेत सुरतेला आणि गुवाहाटीला पळून जायला, त्यांची डोकी नाहीत खोकी आहेत, दिल्लीत इंडिया आघाडीतर्फे सर्व खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला आणि महाराष्ट्रात भ्रष्टाचाराविरुध्द शिवसेना रस्त्यावर उतरली. भारतीय जनता पक्षाच्या जुलुमशाहीविरुध्द जनतेला आता रस्त्यावर उतरावेच लागेल. ती फक्त नेतृत्व कोण करतेय, याची वाट पाहतेय, असे सांगून ते म्हणाले की,’ छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, साधुसंतांचा महाराष्ट्र असे आपण दरवेळेला सांगतो. महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा दाखवतो. असा हा गौरवशाली व अभिमान वाटणारा महाराष्ट्र भ्रष्ट आघाडीने कितव्या रांगेत नेऊन बसवला आहे.
महाराष्ट्रात कोणत्याही मंत्र्यावर आरोप झाले तर त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला जातो अशी परंपरा आहे. आपणही मुख्यमंत्री असताना महिलांसंबंधी आरोप असणाऱ्या वनमंत्र्याचा राजीनामा घेऊन त्याला वनवासात पाठवले होते. युती सरकारच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शोभा फडणवीस, महादेव शिवणकर, बबनराव घोलप, शशिकांत सुतार, रवींद्र माने या मंत्र्यांवर आरोप झाले तेव्हा त्यांचे राजीनामे घेतले गेले होते. जनतेच्या मनात संशय आहे त्यामुळे राजीनामे द्या, चौकशीला सामोरे जा, निर्दोष ठरलात तर पुन्हा मंत्रिमंडळात घेईन,असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी बजावले होते. याला म्हणतात जनताभिमुख सरकार. तसे जनताभिमुख सरकार आता नाहीच आहे, आत्ताच्या सरकारचे फक्त पैसे गिळणारे मुख आहे, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी डागले.
Post Views: 18