तभा फ्लॅश न्यूज : एका महिन्याच्या कालावधीत नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील पाच पोलिस कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याची बातमी वाचली. अलीकडे पोलिस कर्मचाऱ्यांच्या निधनाची बातमी सातत्याने वाचायला मिळते. केवळ पोलिसच नाही तर अन्य खात्यातील कर्मचाऱ्यांचेही अकाली निधन होत आहे मात्र यात पोलिसांची संख्या अधिक आहे ही चिंताजनक बाब आहे.
२४ तास ऑन ड्युटी असे पोलिसांचे वर्णन केले जाते त्यामुळेच त्यांच्या कामाची निश्चिती नसते. कामाच्या वेळेची निश्चिती नाही, जेवणाखानाची वेळ नाही, साप्ताहिक सुट्टी मिळेलच याची शाश्वती नाही, झोपेबद्दल काही सांगता नाही, उन – पावसात कुठे काम करावे लागेल याचा नेम नाही. पुरेसे आणि वेळेवर जेवण नाही, पुरेशी झोप नाही, आराम नाही अशा स्थितीत असणाऱ्या व कर्तव्य बजावत असताना पोलिस कर्मचारी अकाली मृत्युमुखी पडण्याच्या घटनेत वाढ होत आहे.
पोलिस कर्मचाऱ्यांना राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक दबावाखाली कसे काम करावे लागते ते कबुतरखाना प्रकरणी विशिष्ट धर्मियांच्या त्यांच्याशी अरेरावीतून दिसून आले आहे. अनेक पोलिसांना दंगल सदृश परिस्थिती हाताळताना काही आक्रमक समूहाकडे दगडफेक आणि जाळपोळ यांचा सामना करावा लागतो. पोलिसांवरील राजकीय दबाव ही तर नवी गोष्ट नाही केवळ सत्ताधारीच नाही तर सर्वच राजकीय पक्षांची मर्जी सांभाळण्याची कसरत पोलिसांना करावी लागते यातून त्यांच्यावर येणारा ताण. या तणातूनही पोलिसांचा जीव गेल्याची उदाहरणे आहेत.
पोलिस कर्मचाऱ्यांच्या अशा अकाली निधनाने सामाजिक स्वास्थ्यास हानी पोहचत आहे. समाजाचे रक्षण करणारेच असे अकाली निघून जाऊ लागले तर समाजाचे रक्षण कोण करणार? म्हणूनच पोलिस कर्मचाऱ्यांच्या अकाली निधनाकडे गांभीर्याने पाहायला हवे. पोलिस कर्मचाऱ्यांचे स्वास्थ्य चांगले चांगले राहिले तरच समाजाचे स्वास्थ्य चांगले राहणार आहे म्हणूनच पोलिस कर्मचाऱ्यांचे अकाली निधन होऊ नये याची काळजी घ्यायला हवी.
Post Views: 57