1 जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी मुंबईत होणार पुरस्कार प्रदान
अहमदनगर, 26 जून (हिं.स.):- महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी येथे जागतीक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परिषद,नवी दिल्ली यांच्या आर्थिक सहकार्यातून हवामान अद्ययावत व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्र (कास्ट) हा प्रकल्प सन २०१८-२०२३ या कालावधीत राबविण्यात आला.या प्रकल्पाला या वर्षासाठीचा उल्लेखनीय कृषि योगदान पुरस्कार मुंबई येथील वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतीष्ठा नच्या वतीने जाहीर झाला आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजे १ जुलै रोजी मुंबई येथे होणार्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.हा प्रकल्प कुलगुरु डॉ.पी.जी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला होता.या प्रकल्पा चे प्रमुख अन्वेषक डॉ.सुनील गोरंटीवार,सह प्रमुख अन्वेषक डॉ.मुकुंद शिंदे व त्यांच्या टीमने नाविन्यपूर्ण संकल्पना मांडून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतून हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये खेचून आणला.मागील पाच वर्षामध्ये या प्रकल्पातर्फे विद्यार्थी,प्राध्यापक व शेतकरी या सर्वांसाठी अत्यंत मोलाचे संशोधन व भविष्यातील शेतीच्या दृष्टीने महत्वाचे असे बळकटीकरणाचे कार्य झाले आहे.या प्रकल्पातर्फे जे तंत्रज्ञान विकसीत झाले आहे.त्याचा लाभ गेल्या तीन वर्षात सुमारे ७०,००० प्रशिक्षणार्थींना झाला आहे.कास्ट प्रकल्पातर्फे झालेले शेतीचे बळकटीकरण निश्चितच महाराष्ट्रासाठी व देशासाठी भुषणावह असे आहे.