नवी दिल्ली, १५ ऑगस्ट (हिं.स.) : भारतीय पैलवान विनेश फोगाट हिची याचिका आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स) फेटाळली आहे. त्यामुळे विनेशसह देशवासीयांना मोठा धक्का बसला आहे. याचिका फेटाळल्यामुळे तिला आता रौप्य पदकापासूनही मुकावे लागले आहे.
विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकच्या 50 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकाराच्या अंतिम फेरीतील सामन्यापूर्वी निलंबित करण्यात आलं होतं. अंतिम फेरीपूर्वी घेण्यात आलेल्या चाचणीत विनेश फोगाटचं वजन 100 ग्रॅमनं जास्त नोंदवलं होतं. यामुळं तिला निलंबित करण्यात आलं होतं. विनेश फोगाटनं या प्रकरणी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टसमध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर 9 ऑगस्टला सुनावणी पार पडली होती. मात्र तिच्या पदरी निराशाच आली.
विनेशने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होताना कठोर परिश्रम करुन वजन घटवलं होतं. मात्र, 2017 पासून बदलेल्या नियमांचा विनेशला फटका बसला. यापूर्वी कुस्ती स्पर्धा एका दिवसात पार पडायची. नंतर ती दोन दिवसात पार पडू लागली यामुळं पैलवानांचं वजन अंतिम फेरीपूर्वी देखील मोजलं जावू लागलं. त्यात तिचं वजन नियमापेक्षा जास्त भरले.