सोलापूर – मुस्लीम स्मशानभूमीत आजोबांच्या कबरीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या सहा वर्षीय चिमुकल्यावर अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव रोड परिसरात काळाने घाला घातला. स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावरील तुटलेले व जीर्ण अवस्थेतील लोखंडी गेट अचानक अंगावर कोसळल्याने अलफैज युसूफ पठाण वय 6 या निष्पाप बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अलफैज हा घराजवळ असलेल्या मुस्लीम स्मशानभूमीत आपल्या आजोबांच्या कबरीचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. दर्शन करून परत येत असताना प्रवेशद्वारावरील जीर्ण व सैल अवस्थेतील लोखंडी गेट अचानक त्याच्या अंगावर कोसळले. या अपघातात अलफैज गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन त्याला जवळील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अलफैजला मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे पठाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष बाब म्हणजे अलफैजचे वडील युसूफ पठाण हे एका हॉटेलमध्ये मजुरीचे काम करतात. पाच मुलींनंतर जन्मलेला अलफैज हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. संपूर्ण कुटुंब, नातेवाईक व परिसरातील नागरिकांचा तो लाडका होता.
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अलफैजच्या पश्चात आई-वडील व पाच बहिणी असा परिवार असून, गरीब कुटुंबावर ओढवलेल्या या संकटानंतर प्रशासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.























