बार्शी – वैराग पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याची हकीकत अशी की, वैराग येथे दि. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११-३० वाजता दरम्यान सदरचा गुन्हा घडला, तो असा आरोपी किरण तुकाराम घरबुडवे, वय ४३, रा. भातंबरे ता. बार्शी, जि. सोलापूर हा धामणगाव येथून त्यांचे गावी भातंबरे ता. बार्शी येथे जात असताना मौजे मुंगशी आर ते उपळे दुमाला जाणारे रोडचे दरम्यान पत्नी व दोन मुले यांचेसह त्यांचे मोटारसायकलवरुन जात असताना रोडवर मयत आरोपीची पत्नी सोनाली हिस तिचे वडिलांचे शेतजमीनीपैकी तिचे हिश्याची असलेली जमीन घेणेबाबत मयत सोनालीस वारंवार सांगत होता, परंतु मयत सोनाली ही वडिलांचे जमिनीमध्ये हिस्सा घेत नव्हती, याचा राग मनात धरुन आरोपी किरण घरबुडवे याने पत्नी सोनाली हिस चिडून जाऊन लोखंडी कोयत्याने डोक्यात व मानेवर वार करुन जीवे ठार मारले. म्हणून फिर्यादी अतुल दिलीप हेडंबे यांनी आरोपी किरण तुकाराम घरबुडवे, रा. भातंबरे याचे विरुद्ध वैराग पोलीस स्टेशन येथे गु. र. नंबर ५७१/२०२१ भादंवि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंदवला. त्यानंतर तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक विनय रामचंद्र बहिर यांनी आरोपीस ताब्यात घेऊन सबळ पुरावा गोळा करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.. त्यानंतर सदर खटल्याची सुनावणीमध्ये सहाय्यक सरकारी अभियोगता दिनेश देशमुख यांनी काम पाहिले. सदर खटलामध्ये सुनावणी दरम्यान फिर्यादी, आरोपीची मुलगी इतर साक्षीदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
सदर प्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. तसेच तपासा दरम्यान गोळा केलेले पुरावे हे सरकारी वकील यांनी न्यायालयासमोर मांडले. सरकारी पक्षाचा पुरावा याचा विचार करता जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही.एस. मलकलपट्टी रेड्डी यांनी आरोपी किरण तुकाराम घरबुडवे यास भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंड जर दंड नाही भरला तर सहा महिन्याची साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी काम पाहिले. सदर केसमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शीचे अशोक सायकर व वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. सदर गुन्ह्याचा तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विनय रामचंद्र बहिर यांनी केला होता. तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोहेकॉ ८९५ कुणाल पाटील यांनी काम पाहिले.


















