सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती या ज्ञान-आधारित गेमशो मध्ये सध्या नवरात्रीचा सण साजरा होत असताना दृढ निर्धार आणि चिकाटीचे सामर्थ्य दाखवणारी कहाणी तुमचा टेलिव्हिजनचा पडदा उजळून टाकेल. या जगात बऱ्याचदा सकारात्मकता आणि प्रेरणा या गोष्टी क्षणभंगुर वाटतात, अशा वेळी तळेगावहून आलेल्या श्रीदेव वानखेडेची कहाणी ऐकून दृढ निर्धाराविषयीचे तुमचे मत नक्की बदलेल! आत्मविश्वासाने हॉटसीटवर विराजमान झालेल्या श्रीदेवची प्रेरणादायक कहाणी प्रेक्षकांना आशेचा किरण दाखवणारी हृदयस्पर्शी कहाणी असेल.
2011 मध्ये एका दुर्दैवी कार अपघातात श्रीदेवचे कमरेखालचे शरीर पांगळे झाले आणि त्याला व्हीलचेअर कायमची चिकटली. परंतु त्याने हार मानली नाही आणि तो आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करत राहिला. शारीरिक अक्षमतेला न जुमानता त्याने KBC मध्ये येण्याचे प्रयत्न अविरत चालू ठेवले, जेणे करून त्याच्यासारख्या इतर पंगू लोकांना प्रेरणा मिळावी आणि स्वतःच्या उपचारांसाठी त्याला मोठी रक्कम जिंकता यावी.
सेटवरील सूत्राने सांगितले, “श्रीदेवची कहाणी ऐकून अमिताभ बच्चन हेलावून गेलेले दिसले. या परिस्थितीत त्याच्या कुटुंबीयांनी आणि जया वानखेडे या त्याच्या पत्नीने त्याला जो खंबीर आधार दिला, त्याचे त्यांनी खूप कौतुक केले. हताशेच्या मनःस्थितीतून आपल्या माणसाला बाहेर काढण्यात कुटुंबियांची भूमिका किती महत्त्वाची असते, यावर त्यांनी भर दिला. स्त्रियांमधील या अद्भुत शक्तीला सलाम करताना त्यांनी जया वानखेडेच्या नावाने जयघोष केला!”
आपल्या प्रवासाविषयी सांगताना श्रीदेव म्हणाला, “2011 मध्ये माझा अपघात झाल्यानंतर मी हताशेच्या गर्तेत गेलो होतो. पण माझी बालपणीची मैत्रीण, जी आता माझी पत्नी आहे, तिने मला यातून बाहेर काढले. अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग जयाने मला दाखवला आणि हे शिकवले की, प्रेम आणि निर्धारामुळे अगदी कितीही कठीण लढाई असली तरी ती जिंकता येऊ शकते. त्यानंतर मी मग कधीच मागे वळून पाहिले नाही. कौन बनेगा करोडपतीसारख्या शोमध्ये सहभागी होण्याचे धाडस मला जयाने दिलेल्या आधारातून मिळाले. या सेटवर अमिताभ बच्चन केवळ या शोचे सूत्रसंचालन करत नाहीत, तर स्पर्धकाला भक्कम आधारही देतात. त्यांनी माझी व्हीलचेअर खेचत आणली, मला डोळे पुसायला टिशू दिले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या स्वप्नावर विश्वास ठेवला. माझ्या निराशेच्या काळात मला साथ देणाऱ्या माझ्या पत्नीचे त्यांनी गुणगान केले. तया क्षणी मला हे जाणवले की हा लढा फक्त माझा नव्हता, तर माझ्यावर विश्वास असलेल्या अनेकांचा तो लढा होता.”
18 ऑक्टोबर रोजी सादर होणारा हा सुंदर एपिसोड चुकवू नका कारण श्रीदेव वानखेडेची गोष्ट आपल्याला हे दाखवून देते की, जेव्हा प्रेम आणि विश्वासाची साथ मिळते, तेव्हा माणूस कोणत्याही संकटावर मात करू शकतो.
बघा, ‘नवरात्री स्पेशल वीक’ कौन बनेगा करोडपती सीझन 15 मध्ये रात्री 9:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!