चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात चिटकी गावालगत शेतात एका हत्तीचा मृतदेह मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. यामुळे एकच खळबळ माजली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी शेतात सोडलेल्या जिवंत वीज प्रवाहाला स्पर्श होऊन हत्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत उपक्षेत्र तांबेगडी मेंढा येथील नियत क्षेत्र मुरपार बीटा मधील चितकी गावालगत काही नागरीकांना मृताअवस्थेत जंगली हत्ती आढळून आला. त्यानंतर सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. लगेच घटनास्थळी वनपरिक्षेत्र विभागाचे अधिकारी आपल्या चमुसह दाखल झाले. तसेच पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. वर्षभरापूर्वी हत्तीचा कळप चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाला होता. महिनाभरापासून एक हत्ती सिंदेवाही तालुक्यातील शेत शिवारात धुडगूस घालत होता. शेतकऱ्यांनी शेतात सोडलेल्या जिवंत वीज प्रवाहाला स्पर्श होऊन हत्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.