गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर दूध संघाने पाडले आहेत. गाईच्या दुधाला किमान ३४ रुपये लिटर दर दिला पाहिजे हा सरकारचा अध्यादेश सर्व दूध संघांनी धुडकावून लावला आहे. त्यामुळे किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले अकोले तहसीलदार कचेरीसमोर इतर दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
दूध दरवाढीच्या मागणीसाठी किसान सभेतर्फे अकोले येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आज आंदोलकांची भेट घेऊन आपला पाठिंबा व्यक्त केला. दुधाला दर वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे. आपण ग्राहक म्हणून दूध महागड्या दराने खरेदी करीत असतोच, त्यातील दहा रुपये शेतकऱ्यांना दिले तर बिघडले कुठे? शेतकरी परग्रहावरून आलेले नाहीत. ते आपलेच बांधव आहेत, त्यामुळे त्यांच्या आंदोलनास आपला पाठिंबा राहील, असे अनासपुरे म्हणाले.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर दूध संघाने पाडले आहेत. गाईच्या दुधाला किमान ३४ रुपये लिटर दर दिला पाहिजे हा सरकारचा अध्यादेश सर्व दूध संघांनी धुडकावून लावला आहे. या संदर्भात दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी प्रतिनिधी व दूध संघांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेतली. परंतु त्या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले अकोले तहसीलदार कचेरीसमोर इतर दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत बेमुदत उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या उपोषणाचा आजचा ६ वा दिवस आहे.
या आंदोलनाला आता पाठिंबा वाढत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन केलेलं आहे. आपण सरकारसोबत चर्चेतून मार्ग काढू, आंदोलकांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, असे पवार यांनी म्हटले आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
अभिनेता अनासपुरे आज आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार होणे हे महत्वाचे आहे. गेली आठ वर्षे शेतकरी बांधवांच्या बाजूने काम करताना बऱ्याच गोष्टी मला आढळून आल्या आहेत. या शेतकऱ्यांची दूध दरवाढीची मागणीही योग्य आहे. त्यांच्या रास्त मागण्यांना माझा तहहयात पाठिंबा राहील. आंदोलनाचे नेते डॉ. अजित नवले यांनी अनासपुरे यांचे आभार व्यक्त केले.