पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी उत्तराखंडच्या दौऱ्यावर पोहचलेत. यावेळी राज्यातील पिथौरागड येथे त्यांनी 4200 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. तत्पूर्वी पंतप्रधानांनी आदि कैलासाचे दर्शन घेऊन पार्वती कुंड येथे पूजा केली. उत्तराखंडमधील भारत-चीन सीमेवरील आदी कैलास पर्वताला भेट देणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत.
उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यातील 18 हजार फूट उंच लिपुलेख पर्वतावरून कैलास पर्वत स्पष्टपणे दिसतो. येथून पर्वताचे हवाई अंतर 50 किलोमीटर आहे. पंतप्रधान सकाळी 9.30 वाजता पिथौरागढ जिल्ह्यातील गुंजी गावात पोहोचले. येथील स्थानिक कला आणि उत्पादनांवर आधारित प्रदर्शनात पंतप्रधान सहभागी झाले. त्यासोबतच पंतप्रधानांनी सैन्य, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या (बीआरओ) जवानांशी संवाद साधला.
त्यानंतर अल्मोडा जिल्ह्यातील जागेश्वर धामला त्यांनी भेट दिली. समुद्र सपाटीपासून सुमारे 6200 फूट उंचीवर असलेल्या जागेश्वर धाममध्ये 224 दगडी मंदिरे आहेत. यानंतर पंतप्रधानांनी पिथौरागढ येथे ग्रामीण विकास, रस्ते, वीज, सिंचन, पिण्याचे पाणी, फलोत्पादन, शिक्षण, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांशी संबंधित सुमारे 4200 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. पंतप्रधानांच्या पूर्वनियोजीत कार्यक्रमानुसार ते 2 दिवस उत्तराखंड दौऱ्यावर राहणार होते. परंतु, काही कारणास्तव त्यांचा दौरा एक दिवसीय करण्यात आला.