मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे- पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. आंदोलनाच्या माध्यमातून ते घराघरात पोचले. आता त्यांची क्रेझ शाळा- महाविद्यालयातही पहायला मिळत आहे. इयत्ता बारावीच्या सहामाही परीक्षेतील राज्यशास्त्राचा पेपर सोडविताना बीबी दारफळ येथील विद्यार्थ्याने ‘एक मराठा एक कोटी मराठा’ अशी सुरुवात करूनच उत्तरपत्रिका सोडविली आहे.
बी.बी. दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील आदर्श शिक्षण मंडळ बीबीदारफळ प्रसारक संचलित. श्री गणेश विद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयात संकेत लक्ष्मण साखरे (१९) हा बारावीत शिक्षण घेत आहे. त्याने सहामाहीचा पेपर सोडविताना उत्तरपत्रिकेची सुरुवात चक्क ‘एक मराठा कोटी मराठा’ असे लिहून केली.बी. बी. दारफळ येथील संकेत लक्ष्मण साखरे याचा गुरुवारी (ता. २) सहामाही परीक्षेचा राज्यशास्त्र विषयाचा पेपर होता. पेपरची सुरुवातच त्याने ‘जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, एक मराठा कोटी मराठा’ असे लिहून केली. त्याची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल हो आहे.