उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे 20 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाही, तर जीवे मारू असे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे. सदर धमकी ई-मेलमार्फत आल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने अंबानींच्या मेल आयडीवर धमकीचा ई-मेल पाठवला होता. ई-मेलमध्ये मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यात लिहिले आहे की, तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाही, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम नेमबाज आहेत. सदर मेल पूर्णपणे इंग्रजीत होता.
धमकीचा मेल मिळाल्यानंतर अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, गावदेवी पोलिसांनी भादंवि कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
याआधीही आल्या आहेत धमक्या
अंबानी यांना गेल्या वर्षीसुद्धा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर एका व्यक्तीने दक्षिण मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलला फोन करून हॉस्पिटल उडवून देईन आणि मुकेश, नीता अंबानी आणि त्यांच्या दोन्ही मुलांना मारणार असल्याचे सांगितले होते. याबरोबरच आरोपींनी अंबानींचे घर अँटिलियाला बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली होती.
घराजवळ सापडली होती स्फोटकांनी भरलेली कार
2021 मध्येही मुकेश अंबानींच्या अँटिलिया घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. कारमधून 20 जिलेटिनच्या कांड्या आणि एक पत्र सापडले होते, ज्यामध्ये अंबानी कुटुंबाला धमकी देण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी करून काही जणांना अटक केली होती. अंबानी यांच्या घराजवळ कार सापडल्यानंतर त्यांच्या जिवाला धोका असल्याचे सांगण्यात आले.