मोडनिंब येथील वेताळ देवस्थान परिसरात झालेली अतिक्रमणे तातडीने काढावीत, यासाठी मोडनिंब येथील नागरिक सोमवार (दि.२७ रोजी) बेमुदत उपोषणास बसले आहेत. प्रशासनाने यासंबंधीच्या प्रश्नात काही कारवाई न केल्यास हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, आंदोलनास पाठिंबा म्हणून व्यापारी संघटना, सामाजिक संस्था व ग्रामस्थांनी आज मंगळवार मोडनिंब बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
बुद्ध पौर्णिमा दरम्यान भरवल्या मोडनिंब येथील श्री वेताळ देवस्थान यात्रेस भाविकांची प्रचंड गर्दी असते.यात्रेसाठी भरविल्या जाणाऱ्या जागेवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याने या ठिकाणची अतिक्रमणे तातडीने काढण्यासाठी जानेवारी मध्ये विशेष ग्रामसभेचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठराव ग्रामसभेत मंजूर करूनही संबंधितांनी या ठरावावर कोणतीही कार्यवाही केली नाही, असे उपोषणकर्त्यांचे मत आहे. ग्रामपंचायत प्रशासनास वारंवार विनंती करूनही ग्रामपंचायतीने या विषयावर मौन धारण केल्याने आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे, असे उपोषणकर्ते प्रकाश गिड्डे यांनी यावेळी सांगितले.
श्री. गिड्डे यांच्यासह कुरण गिड्डे, संभाजी लादे, विजय खेलबुडे, उदय जाधव, हनुमंत यादव, जयवंत ओहोळ, राजकुमार खडके आदी नागरिक उपोषणास बसले आहेत. या उपोषणादरम्यान शिवसेना नेते संजय कोकाटे, माजी सभापती शिवाजी कांबळे, भारत शिंदे, प्रशांत गिड्डे, बालाजी पाटील, वैभव मोरे, बाबूराव सुर्वे, संभाजी गिड्डे आदींनी उपोषणस्थळी भेट दिली.सदर उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज व्यापारी वर्ग व ग्रामस्थांनी मोडनिंब बंद ची हाक दिली आहे.