आदेश बांदेकर यांनी मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा गेली अनेक वर्ष सांभाळली होती
‘महाराष्ट्राचे लाडके भावोजी’ म्हणून घराघरात पोहचलेले शिवसेना नेते म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते आदेश बांदेकर…. याच आदेश बांदेकर यांनी मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा गेली अनेक वर्ष सांभाळली. देशावर, राज्यावर वा मुंबईवर आलेल्या अनेक संकटांच्या काळात न्यासाने सढळ हस्ते मदतीचा हात पुढे केलाय. पण आता याच आदेश बांदेकर यांना मोठा धक्का बसलाय. शिवसेना शिंदे गटाकडून आदेश भाऊजींना मोठा धक्का देण्यात आलाय. महाराष्ट्र शासनाअंतर्गत येणाऱ्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदावरुन आदेश बांदेकरांना बाजूला करत शिंदे गटाच्या आमदाराला अध्यक्षपद देण्यात आले आहे. माहीम विधानसभेचे आमदार सदानंद सरवणकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन राजपत्राद्वारे याची घोषणा करण्यात आली आहे.
कोण आहेत आदेश बांदेकर?
आदेश बांदेकर हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जातात
सलग १९ वर्षे ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच बांदेकर यांनी २००९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.
माहीम विधानसभा मतदारसंघात त्यांना मनसेचे नितीन सरदेसाई यांच्याविरोधात मैदानात उतरवण्यात आले.
या लढाईत त्यांच्या पदरी पराभव पडला, पण शिवसेनेतील त्यांचं महत्त्व तसूभरही कमी झालं नाही.
शिवसेनेच्या प्रचारात ते नेहमीच आघाडीवर राहिले.
शिवतीर्थावरील दसरा मेळावा ते उद्धव ठाकरेंच्या प्रचारसभा, त्याचं सूत्रसंचालन बांदेकरांकडेच असतं.
ही निष्ठा व सचोटीमुळे जुलै २०१७ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात
शिवसेनेच्या कोट्यातून त्यांची श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासावर वर्णी लागली होती.
२३ जुलै २०२० ला पुन्हा तीन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची पुनर्नियुक्ती केली होती.
आता शिवसेना पक्ष फुटीनंतर देखील ते उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलेत.
आता आदेश बांदेकर यांचा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ २३ जुलै २०२३ रोजी संपुष्टात आला. आता ६ नोव्हेंबर २०२३ पासून पुढील ३ वर्षांच्या कालावधीसाठी सदानंद सरवणकर हे व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपरि असतील असं पत्रकात म्हटलेलं आहे.
कोण आहेत सदा सरवणकर?
सदा सरवणकर १९९२ ते २००७ अशी १५ वर्ष मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. त्यानंतर २००४ मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले.
विशेष म्हणजे २००९ मध्ये सदा सरवणकर यांना तिकीट नाकारत आदेश बांदेकर यांना तिकीट देण्यात आलं. त्यावेळी नाराज झालेल्या सरवणकरांनी शिवसेनेची साथ सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करत २००९ ची निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत बांदेकर-सरवणकर या दोघांनाही पराभवाचा झटका बसला. मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी बाजी मारली.
२०१२ मध्ये सदा सरवणकरांनी पुन्हा शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला. आधी २०१४ आणि आता २०१९ मध्ये सदा सरवणकर सलग दोन टर्म आमदार म्हणून निवडून येत आहेत.