आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक श्री क्षेत्र आळंदीत जमले असताना या वारीला पहिल्याच दिवशी गालबोट लागल्याची बातमी समोर आली आहे. आज संध्याकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढपूरच्या दिशेने प्रस्थान होणार असतानाच पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि झटापट झाली.
मंदिर प्रवेश करण्यासाठी वारकरी आग्रह धरत होते. पण याचवेळी पोलिसांनी वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. वारकऱ्यांनी पोलीस बंदोबस्तातील कर्मचारी आणि बॅरिकेट्स ढकलून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी पुन्हा पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. पण वारकरीही चांगलेच संतापले होते. अशात पोलिसांनी काही वारकऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
त्याचं झालं असं की, 47 दिंड्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा परवानगी देण्यात आली होती. यातील प्रत्येक दिंडीतील 75 वारकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रवेश दिला जातो. पण यातील काही वारकऱ्यांना पोलिसांनी मंदिरात प्रवेश नाकारला. त्या वारकऱ्यांनी प्रवेश देण्याचा आग्रह केल्याने पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये झटापट झाली. या घटनेमुळे मंदिर परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होते. या प्रकारानंतर पोलिसांनीही मंदिरात बंदोबस्त वाढवला आहे.