सोलापूर – उजनी समांतर जलवाहिनी कामा संदर्भात लवादात जवळजवळ समजोता झाला आहे. येत्या पंधरा दिवसात संबंधित मक्तेदाराला सुधारित मान्यता देण्यात येईल. यातील सर्व विघ्न दूर झाले आहेत. लवकरच या जलवाहिनीचे काम सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी दिली.सोलापुरात नियोजन भवन येथे आयोजित स्मार्ट सिटी व सोलापूर विकास आराखडा संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त शीतल तेली – उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महावितरणचे सांगळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे देशपांडे आदी उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात माहिती दिली.
उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनी कामा संदर्भात जुना मक्तेदार असलेल्या “पोचमपाड” कंपनीने लवादात धाव घेतली होती. त्याने नव्या लक्ष्मी कंपनीलाही प्रतिवादी केले होते. दरम्यान लवादामध्ये याप्रकरणी जवळ जवळ समजोता झाला आहे. येत्या पंधरा दिवसात संबंधित मक्तेदाराला सुधारित मान्यता देण्यात येईल.
या कामातील सर्व विघ्न आता दूर झाले आहेत. यामुळे लवकरात लवकर काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. शहराला अधिक पाणीपुरवठा या कामानंतर उपलब्ध होईल, असेही पालकमंत्री विखे – पाटील यांनी यावेळी सांगितले.

















