भारतीय हवाई दलाच्या लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट (एलसीए) मार्क 1-ए लढाऊ विमानामध्ये ‘उत्तम’ आणि ‘अंगद’ या 2 नवीन प्रणाली समाविष्ट करण्यात येणार आहेत. यामुळे भारतीय बनावटीचे हलक्या वजनाचे लढाऊ विमान अधिक सुसज्ज यंत्रणांनी शत्रूला सामोरे जाण्यास तयार असेल.
एलसीए मार्क 1-ए लढाऊ विमानामध्ये ‘उत्तम’ रडार आणि ‘अंगद’ इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर संच हे विकसित तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. उत्तम अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक स्कॅन केलेले रडार आणि अंगद इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर संच या प्रणाली सध्या विकासित टप्प्यात आहेत. या प्रणाली लवकरच एलसीए मार्क 1-ए लढाऊ विमानांमध्ये सामील केल्या जातील, अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. केंद्र सरकार लष्करी सामर्थ्य वाढवण्यासोबतच त्यामध्ये स्वदेशीकरणाच्या दिशेनेही वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहे. याच दृष्टीने लष्करात स्वदेशी बनावटीची विमाने आणि क्षेपणास्र सामील करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. भारतीय वायुसेना ‘मेड इन इंडिया’ एलसीए मार्क 1-ए लढाऊ विमानांमध्ये ‘उत्तम’ रडार आणि ‘अंगद’ इलेक्ट्रॉनिक युद्ध संच प्रणालीने सुसज्ज आहे. भारतीय हवाई दलात आधीच 83 एलसीए मार्क 1-ए लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला आहे. भविष्यात आणखी 97 एलसीए फायटर जेट हवाई दलात सामील करण्याची योजना आहे.
संरक्षण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात तयार करण्यात आलेल्या ‘मार्क 1 ए’ या हलक्या लढाऊ विमानात प्रथम ‘उत्तम’ रडार आणि ‘अंगद’ इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट बसवण्यात येणार आहे. उत्तम अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक स्कॅन केलेले ऍरे रडार आणि अंगद इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट स्वदेशी पद्धतीने विकसित केले जात असल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.भारतीय हवाई दलाने 83 एलसीए मार्क 1-ए साठी करार केला होता. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वायू दलात आणखी 97 विमाने सामील होणार आहेत. त्यानंतर, भारतीय वायूसेनेतील एलसीए मार्क 1-ए विमानांची संख्या 180 असेल असे त्यांनी स्पष्ट केले.