उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. थोड्याच वेळात एनडीआरएफकडून कामगारांची सुटका करण्यात येईल.
उत्तराखंडमधील उत्तरकाशीमधील सिलक्यारा बोगद्यातील खोदकाम पूर्ण झालं आहे. गेल्या १७ दिवसांपासून कामगार बोगद्यात अडकले होते. आज हे कामगार १७ व्या दिवशी सूर्यप्रकाश पाहणार आहेत. दिवाळीच्या दिवशी सकाळी बोगद्याचं काम सुरु असताना मातीचा ढिगारा खाली आला आणि ४१ कामगार आत अडकले. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी ६० मीटरचा ढिगाऱ्यात खोदकाम करण्यात आलं. गेल्या १७ दिवसांपासून ऑगर मशीनच्या सहाय्यानं खोदकाम करण्यातं आलं होतं. मात्र, अखेरच्या टप्प्यात कामगारांनी खोदकाम करुन अखेरचा टप्पा पूर्ण केला. आता थोड्याच वेळात कामगारांना सिलक्यारा बोगद्यातून बाहेर काढण्यात येणार आहे.
सिलक्यारा बोगद्यातून कामगारांना बाहेर आणताना ते गेल्या १७ दिवसांपासून ज्या वातावरणात होते त्याचा विचार करता त्यांना बाहेर काढण्याची गडबड केली जाणार नाही. मात्र, सिलक्यारा बोगद्याजवळ रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या आहेत. एनडीएआरएफचे जवान हे सिलक्यारा बोगद्यात दाखल झाले असून यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिहं धामी देखील तिथं दाखल झाले आहेत.
या बोगद्यातून एका कामगाराला बाहेर काढण्यासाठी २ ते ३ मिनिटांचा वेळ लागणार आहे, अशी माहिती आहे. या बोगद्यातून कामगारांना बाहेर काढल्यानंतर थेट रुग्णालयात नेण्यात येणार आहे. याशिवाय कामगारांच्या कुटुंबीयांनाच त्यांना भेटता येणार आहे, अशी माहिती आहे.
एनडीआरएफची रेस्क्यू टीम बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचली आहे. सिलक्यारा बोगद्यात ड्रिलिंगच्या कामासाठी अमेरिकन ऑगर मशीनचा वापर करण्यात आला होता. ४८ मीटर पर्यंतचं खोदकाम केल्यानंतर मशीनचे ब्लेड तुटले आणि बचावकार्य थांबवावं लागलं होतं. यानंतर कामगारांकडून खोदकाम करण्यात आलं. यासाठी ६ रॅट मायनर्सची टीम सिलक्यारा येथे बोलवण्यात आली होती. या रॅट मायनर्सनी दिल्ली आणि अहमदाबादमध्ये अशा प्रकारचं काम केलं होतं.
बोगद्यात ८०० मिमी व्यासाची पाइप टाकण्यात आली असून एनडीआरएफची टीम या पाइपद्वारे मजुरांपर्यंत पोहोचली आहे. मजुरांना या पाइपद्वारे बाहेर काढण्यात येईल. रेस्क्यू टीमनं बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना यासंदर्भातील सूचना दिल्या आहेत. मजुरांना बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेलं जाणार आहे.