काँग्रेस नेते शशी थरुर यांनी ‘हमास’ संघटनेला दहशतवादी म्हंटल्यामुळे केरळच्या मुस्लीम संघटना संतापल्या आहेत. महल एम्पॉवरमेंट मिशनने (एमईएम) पॅलेस्टाईनच्या समर्थनात आयोजित कार्यक्रमातील पाहुण्यांच्या यादीतून थरूर यांचे नाव वगळले आहे. आगामी 30 ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे.
केरळच्या कोझिकोडमध्ये इंडियन मुस्लिम लीगने (आययूएमएल) 26 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टीनच्या समर्थनात एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. यावेळी आपल्या भाषणादरम्यान थरूर यांनी इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याला दहशतवादी घटना असे वर्णन केले होते. या विधानावरून थरूर यांना सोशल मीडियावर जोरदार विरोध झाला. यानंतर थरूर यांनी 27 ऑक्टोबर रोजी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आणि म्हणाले – ते नेहमीच पॅलेस्टाईनच्या लोकांसोबत आहेत. आययूएमएल रॅलीतील त्यांच्या 32 मिनिटांच्या भाषणातील 25-सेकंद भागाशी ते सहमत नाहीत.
आयूएमएलच्या कार्यक्रमात शशी थरूर म्हणाले होते की, दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला केला. त्यांनी 1400 लोक मारले. तब्बल 200 इस्त्रायली नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने आतापर्यंत 6 हजार लोकांचा बळी घेतला आहे. त्यांनी गाझाला अन्न, पाणी आणि इंधनाचा पुरवठा बंद केला आहे. रोज निरपराध लोक मारले जात आहेत. रुग्णालयांवर बॉम्बफेक होत आहे. मानवी हक्कांचे खुलेआम उल्लंघन होत आहे. मला एक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा त्या दहशतवाद्यांनी नि:शस्त्र लोकांची कत्तल केली तेव्हा संपूर्ण जगाने त्याचा निषेध केला. आता सर्वजण इस्रायलच्या बॉम्बफेकीचा निषेध करत आहेत, तर दोन्ही बाजूंनी दहशतवादी हल्ले झाले. शशी थरूर यांच्या या विधानामुळे केरळच्या मुस्लिम संघटना संतापल्या आहेत. महल एम्पॉवरमेंट मिशनने (एमईएम) पॅलेस्टाईनच्या समर्थनात तिरुअनंतपुरम येथे 30 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनच्या समर्थनात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात पूर्वी शशी थरुर यांना बोलावण्यात आले होते. परंतु, थरूर यांच्या वक्तव्यानंतर एमईएमने कार्यक्रमातील पाहुण्यांच्या यादीतून थरूर यांचे नाव वगळले आहे.
काँग्रेस पक्षाने 9 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे आयोजित काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पॅलेस्टिनला पाठिंबा दिलाय. त्यामुळे थरुर यांनी हमासला दहशतवादी संघटना म्हंटल्यामुळे पक्षाची देखील गोची झाली आहे.