कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षाचे प्रमुख एच.डी. कुमारस्वामी यांच्यावर काँग्रेसने वीज चोरीचा आरोप केला. कुमारस्वामी यांनी बेकायदेशीर वीज जोडणीच्या माध्यमातून दिवाळीची रोषणाई केल्याचा व्हिडीओ काँग्रेसने मंगळवारी ट्विटरवर (एक्स) शेअर केलाय.
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र कुमारस्वामीवर टीका करणाऱ्या विधानासह काँग्रेसने एक व्हिडिओ पोस्ट केला. यात कुमारस्वामी यांच्या बेंगळुरूच्या जेपी नगर येथील निवास्थानी अवैध वीज जोडणीचा आरोप करण्यात आलाय. यासोबतच काँग्रेसने ट्विटरवर टीका करताना म्हंटले आहे की, “जगातील एकमेव प्रामाणिक व्यक्ती असलेल्या एचडी कुमारस्वामी यांचे जेपी नगर येथील निवासस्थान थेट विजेच्या खांबांवरून बेकायदेशीर वीज जोडणी असलेल्या सजावटीच्या दिव्यांनी उजळले होते. ही शोकांतिका आहे की, माजी मुख्यमंत्र्याला फक्त वीज चोरी करण्यासाठी इतक्या गरिबीचा सामना करावा लागत आहे.!” या प्रकरणावर बेस्कॉम कारवाई करणार असल्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सांगितले होते. त्यानंतर बेंगळुरू इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीने (बेस्कॉम) गुन्हा दाखल केला आहे.
या आरोपांना उत्तर देताना एचडी कुमारस्वामी म्हणाले की, ही त्यांची चूक नसून एका खाजगी डेकोरेटरची चूक आहे. ज्याने जवळच्या विद्युत खांबाला थेट कनेक्शन दिले. त्यांनी सांगितले की, त्यांना हे कळताच त्यांनी तात्काळ ते काढून टाकले आणि घराच्या मीटर बोर्डवरून वीज कनेक्शन घेतले. सोबतच कुमारस्वामी म्हणाले की, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करून नोटीस जारी करावी, मी दंड भरेन. मी कोणत्याही राज्य संपत्तीचा अपहार केला नाही किंवा कोणाचीही जमीन बळकावली नाही. मला संपत्तीची एवढी तहान नाही की ती कुणाच्या रक्ताने शमवता येईल असा टोला कुमारस्वामी यांनी लगावला आहे.