केरळच्या एर्नाकुलम येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज, रविवारी 3 बॉम्बस्फोट झाले. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला, तर 30 जण जखमी झालेत. केरळमध्ये इस्त्रायल आणि ज्यू समुदायाबद्दल गेल्या काही दिवसांपासून ‘हेटस्पीच’ सुरू होते त्याची परिणीती म्हणून या स्फोटांकडे पाहिले जातेय.
यासंदर्भातील माहितीनुसार कलामासेरी येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ज्यू समुदायाचे लोक सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास प्रार्थना करत होते. त्यावेळी अवघ्या 5 मिनिटांत सलग तीन स्फोट झाले. जेहोवाज विटनेसेस संस्थेतर्फे मिळालेल्या माहितीनुसार कन्व्हेन्शन हॉलमध्ये सकाळी 9:45 वाजता 3 स्फोट झाले. प्रार्थना संपल्यानंतर काही सेकंदातच स्फोट झाले. पहिला स्फोट हॉलच्या मध्यभागी झाला. काही सेकंदांनंतर, हॉलच्या दोन्ही बाजूला आणखी 2 स्फोट झाले. एर्नाकुलममध्ये जिथे स्फोट झाला. त्याच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने ज्यू समुदायाचे लोक राहतात.
एर्नाकुलममध्ये 2 दिवसांपूर्वी हमासच्या समर्थनार्थ रॅलीही काढण्यात आली होती. तसेच राज्यातील मलप्पुरम येथे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हमासचा कमांडर खालेद मशाल याने भारतातील केरळच्या मलप्पुरम येथे व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून नागरिकांना संबोधित केले होते. तर कोझिकोडमध्ये इंडियन मुस्लिम लीगच्या कार्यक्रमात काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी हमासवर टीका केली होती. त्यामुळे महल एम्पॉवरमेंट मिशनने (एमईएम) पॅलेस्टाईनच्या समर्थनात तिरुअनंतपुरम येथे 30 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनच्या समर्थनात आयोजित कार्यक्रमातून शशी थरूर यांना वगळण्यात आलेय. राज्यात प्रचंड प्रमाणात द्वेषाचे वातावरण असून यातूनच बॉम्बस्फोट घडले असावेत अशी शक्यता वर्तवली जातेय.























