कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रविवारी सकाळी दिवा रेल्वे स्थानकात रेल रोको केले. परिणामी या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दुसरीकडे पनवेलनजीक शनिवारी मालगाडीच्या अपघातातील डबे हटविण्याचे काम रविवारी युद्धपातळीवर सुरू आहे. चारपैकी दोन डबे काढण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले.
गेल्या काही दिवसांपासून कोकण रेल्वेच्या कारभाराचा फटका चाकरमान्यांना बसत आहे. प्रवाशांना वेळेत गाड्या मिळत नसल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. आजही गणेशोत्सव आटोपून परतणाऱ्या चाकरमान्यांना गाड्या नसल्याने मनस्ताप सहन करावा लागला. ज्यानंतर संतप्त प्रवाशांनी रेल्वे सेवा रोखून धरत आपला संताप व्यक्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशोत्सव आटोपून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दरम्यान काल पनवेल येथे मालगाडीचा अपघात झाला. त्यामुळे मुंबईहून कोकणात जाणार्या गाड्या उशिराने धावत होत्या. परिणामी परत येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होत गाड्या विलंबाने धावत आहेत. आजही दिवा रेल्वे स्थानकातून सावंतवाडीकडे जाणारी पॅसेंजर वेळेवर सुटली नाही. त्यामुळे प्रवाशांना दिवा रेल्वे स्थानकातून कोकणात जाणार्या फलाटावर रेल्वे रोको करून नाराजी व्यक्त केली.
सीएसएमटीपासून ठाण्यापर्यंत काल रात्रीपासून लोक उभे आहेत. गाडी सुरू होणार नव्हती, मग रेल्वेने तिकीट कशाला द्यायची. रात्रभर आम्ही वाट पाहत होतो. रेल्वेकडून सातत्याने गाडी सुरू होईल, सुरू होईल सांगण्यात येत होते. मात्र गाडी सुरू झाली नाही. वंदे भारत ट्रेन जाऊ शकते आमची कोकणातील ट्रेन का जाऊ शकत नाही, असा संतप्त प्रश्नही प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
संतप्त प्रवाशांनी ट्रॅकवर उतरत वाहतूक रोखून धरली. या प्रवाशांनी १, २ आणि ३ या रेल्वे ट्रॅकवर ठिय्या मांडल्याने मध्य रेल्वेची अप आणि डाऊन दिशेची वाहतूकही ठप्प झाली होती. रेल्वे पोलीस बराच वेळ या प्रवाशांची समजूत काढत होते. अखेर तब्बल पाऊण तास गोंधळाच्या परिस्थितीत गेल्यानंतर रेल्वेचे अधिकारी आले. त्यांनी समजूत काढल्यानंतर प्रवासी ट्रॅकवरून बाजूला झाले. मात्र, यामुळे मध्य रेल्वेच्या उर्वरित वेळापत्रकाचेही तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळाले.
दुसरीकडे अपघातग्रस्त मालगाडीचे डबे हटवण्याच्या मोहिमेत रेल्वेची ‘विराट’ विशेष ट्रेन बचावकार्यासाठी आणण्यात आली. या व्यतिरिक्त तीन जेसीबी आणि तीन पोकलेन मदतकार्यासाठी घटनास्थळी आल्या. प्रत्येकी एका डब्यावर तीन लोखंडी कोईल आहेत. या कोईलच्या वजनामुळेच आलेल्या दबावामुळे हा अपघात घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या अपघातात ट्रक देखील पूर्णपणे फाकला गेला आहे.