आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) टीमने आज, बुधवारी धाड टाकली आहे. ईडीचे पथक सध्या त्यांच्या निवासस्थानी शोध घेत आहे. दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी मे महिन्यातही ईडीने संजय सिंह यांच्या घरावर छापे टाकण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या साथीदारांच्या घरांवर आणि कार्यालयांमध्ये देखील शोधमोहीम राबवण्यात आली होती.
यावर्षी जानेवारीमध्ये ईडीने आपल्या आरोपपत्रात संजय सिंह यांचे नाव समाविष्ट केले होते. यावरून संजय सिंह यांनी चांगलाच गोंधळ घातला होता. महिन्यात संजय सिंह यांनी दावा केला होता की ईडीने चुकून त्यांचे नाव जोडले होते. त्यावर ईडीने उत्तर दिले की, आमच्या चार्जशीटमध्ये चार ठिकाणी संजय सिंह यांचे नाव लिहिले आहे. यापैकी 3 ठिकाणी नावाचे स्पेलिंग बरोबर आहे. फक्त एकाच ठिकाणी टायपिंगची चूक झाली. त्यानंतर ईडीने संजय सिंह यांना हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने मीडियामध्ये वक्तव्ये करू नका, असा सल्ला दिला होता. ईडीच्या आरोपपत्रात संजय सिंह यांच्यावर 82 लाख रुपयांच्या देणग्या घेतल्याचा आरोप आहे.
यासंदर्भात बुधवारी ईडीने त्यांच्या घरी पोहोचून त्यांची चौकशी केली. दिल्ली दारू धोरण प्रकरणात ईडीचे दुसरे पुरवणी आरोपपत्र 2 मे रोजी प्रसिद्ध झाले. ज्यामध्ये आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांचेही नाव समोर आले आहे. त्यांना आरोपी करण्यात आलेले नाही.