सोलापूर : सोलापूर विधानसभा निवडणुकीवेळी झालेल्या वादातून पंचायत समिती सदस्य गुरुनाथ कटारे यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करून त्याचा आठ वर्षांपूर्वी खून करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे पुत्र रमेश सिद्रामप्पा पाटील यांना तब्बल आठ वर्षांनंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. १३ ऑक्टोबर २०१४ रोजी माचर्ला मिलजवळ तीन अनोळखी व्यक्तींनी कटारे यांच्यावर तलवार व सतुरने हल्ला करून खून केला होता. या हल्ल्यात नबीलाल शेख जखमी झाले होते. या घटनेने दक्षिण तालुक्यासह सोलापुरात खळबळ माजली होती. राजकीय हेतूसाठीच कटारे यांचा खून करण्यात आल्याची त्यावेळी जोरात चर्चा होती.
विधानसभा निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यातून भाजपच्या तिकिटावर उभे राहिलेले संशयित आरोपीचे वडील सिद्रामप्पा पाटील यांना निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी सुपारी देऊन हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी शिवलिंग पारशेट्टी यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरून माजी आमदार पुत्र रमेश पाटील यांच्यासह प्रमोद ऊर्फ किंगभाई प्रकाश स्वामी, जगदीश ऊर्फ पिंट्या रत्नाकर कोन्हेरीकर, प्रदीप ऊर्फ दीपक ऊर्फ प्रभाकर मठपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय तसेच पुणे गुन्हे अन्वेषण विभागाने केला. दरम्यान, खुनाच्या घटनेनंतर संशयित रमेश पाटील फरार होता. तर इतर संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सोलापूर जिल्हा न्यायालयातील तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. देशपांडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. तेथे या खटल्याची सुनावणी होऊन सुमारे नऊ महिन्यांपूर्वी प्रमोद ऊर्फ किंगभाई प्रकाश स्वामी, जगदीश ऊर्फ पिंट्या रत्नाकर कोन्हेरीकर, प्रदीप ऊर्फ दीपक ऊर्फ प्रभाकर मठपती यांना निर्दोषमुक्त करण्यात आले. तसेच रमेश पाटील यास उच्च न्यायालयात अंतिम अटकपूर्व जामीन मंजूर करून अक्कलकोट येथील न्यायालयात हजर होण्याचा आदेश दिला होता.
त्याप्रमाणे कटारे खून खटल्यातील मुख्य संशयित आरोपी रमेश पाटील हा बुधवार, ७ जून रोजी अक्कलकोट येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शेख यांच्या न्यायालयात शरण आला. खटल्यातील संशयित आरोपी २०१४ पासून फरार असल्याने ताब्याशिवाय तपास होऊ शकत नाही. या गुन्ह्यातील काही गोष्टी आरोपीकडून माहिती करून घेण्याच्या आहेत. शिवाय या गुन्ह्याचा कट कसा रचण्यात आला आणि सुपारीची रक्कम रोख स्वरूपात की बँकेमार्फत दिली याचा तपास करणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद सरकारतर्फे सरवदे यांनी केला.
हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने संशयित आरोपीला पोलीस कोठडी सुनावली होती. ८ जून रोजी पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअक्षीक्षक सस्ते यांनी न्यायालयाच्या परवानगीने रमेश पाटील यास ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस कोठडीची विनंती केली होती. न्यायालयाने १२ जून पर्यंत रमेश पाटील यास पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवार, १२ जून रोजी त्यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या खटल्यात सरकारतर्फे अॅड. गिरीष सरवदे यांनी तर आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.