क्षुल्लक कारणावरून दिवसेंदिवस हाणामारीच्या घटणा घडत असल्याचे आणि त्यातून गंभीर खुनासारखे प्रकार सुध्दा घडल्याचे आपण ऐकत आलो आहे. अशीच एक घटना गोंदिया जिल्ह्याच्या दवनीवाडा पोलीस ठाणे अंतर्गत बोदा येथे घडलेली आहे. ज्यात क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राचा गळा आवळून खून केला आहे.
आरोपी अल्पेश पटले याने त्याचा मित्र आकाश दानवे (वय 20 वर्ष राहणार- बोदा) याला उसने घेतलेले 60 रुपये परत देण्याची मागणी केली. यावर मृतक मित्राने सांगितले, की पैसे सायंकाळी फोन- पे ने पाठवतो. त्यावर आरोपी अल्पेश पटले याचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. त्यामुळे त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यात आरोपी अल्पेश पटले याने आकाश लक्ष्मण दानवे याचा गळा आवळून तुला मारून टाकतो असे म्हणून त्यास खाली जमिनीवर पाडून छातीवर मारहाण केली.
त्यात आकाश हा बेशुद्ध झाला. त्यानंतर लगेचच आकाशला प्राथमिक आरोग्य केंद्र दवनीवाडा येथे हलविण्यात आले तिथून त्याला पुढे उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे हलविण्यात आले. परंतु तेथील वैद्यकीय अधिका-यांनी त्यास मृत घोषीत केल. या घटनेची नोंद घेत दवणीवाडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.