चांदवड टोलनाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. या प्रकरणी टोलनाका प्रशासनाने शेहबाज कुरेशी या कर्मचाऱ्याला निलंबित केले असून पोलिसांनी अटक केली आहे.पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्याची घटना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील कोंढवा येथे घडली होती. त्यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी नाशिक जिल्ह्यात अशी घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सुरू असताना साधारण नऊ वाजेच्या सुमारास नाशिक आग्रा महामार्गावरील चांदवड तालुक्यातील मंगळूर येथील टोल नाक्यावरती काम करणारा कर्मचारी शेहबाज कुरेशी या कर्मचाऱ्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. हा सर्व प्रकार टोल नाक्यावरती असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने टोल प्रशासनाने ही माहिती चांदवड पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी घोषणा देणाऱ्या शेहबाज कुरेशी या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबत आणखी साक्षीदारांचा तपास केला जात असल्याचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक सविता गर्जे यांनी स्पष्ट केले. सर्व तपास झाल्यावर आरोपीला कोर्टात हजर केले जाणार आहे.