जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये बुधवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. हा दहशतवादी टीआरएफ या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
यासोबतच राज्यातील अनंतनागमध्ये पोलिसांनी बुधवारी जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी उमर अमिन थोकर याचे दुकान जप्त केले. सर्कस कामगाराच्या हत्येप्रकरणी हा दहशतवादी सध्या कारागृहात आहे. पोलिसांनी सांगितले की, ‘द गेम मॉडिफिकेशन पॉईंट’ नावाच्या दुकानाचा वापर उमर याने दहशतवादी कारवायांसाठी केला होता. दरम्यान गेल्या आठवड्यात श्रीनगरमधील ईदगाहवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलिसांचा एक निरीक्षक जखमी झाला. इदगाहजवळ दहशतवाद्यांनी इन्स्पेक्टर मसरूर अहमद यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. टीआरएफ-लष्करने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.