जम्मू काश्मीर मध्ये नियंत्रण रेषेजवळ कुपवाडा येथे स्थापण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैंस यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी दि. २० ऑक्टोबर रोजी राजभवन येथे करून हा पुतळा कुपवाडाच्या दिशेने रवाना करण्यात येणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित असणार आहेत.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यातून “आम्ही पुणेकर” या संस्थेतर्फे हा पुतळा उभारण्यात येत आहे. राजभवनात होणाऱ्या कार्यक्रमात “आम्ही पुणेकर” संस्थेचे अध्यक्ष श्री हेमंत जाधव आणि विश्वस्त श्री अभयराज शिरोळे हे या उपक्रमाविषयी माहिती देणार आहेत. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडे दहा फुट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ x ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. या उपक्रमाला सर्वतोपरी सहाय्य केले जाईल असे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे.
कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स च्या ४१ व्या बटालीयनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष श्री अभयराज शिरोळे यांच्या हस्ते दि. २० मार्च २०२३ रोजी पार पडले आहे. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू काश्मीर मधील प्रतिकूल हवामानात दिर्घकाळ तग धरेल असा बनवला गेला आहे. सदर संस्थेतर्फे कुपवाडा येथे भारतीय सैन्यासोबत विविध दीर्घकालीन उपक्रम प्रस्तावित असून त्याची माहिती संस्थेतर्फे पत्रकारांना दिली जाईल. मुंबईतील राजभवनातून रवाना होणारा छत्रपतींचा हा पुतळा बडोदा, दिल्ली मार्गे रस्त्याने प्रवास करून साधारण दहा ते बारा दिवसात कुपवाडा येथे पोहोचेल. वाटेत बडोदा येथे आणि नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात या पुतळ्याचे स्वागत – पूजन स्थानिक नागरिकांतर्फे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वाटेत ठिकठिकाणी छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याचे स्वागत विविध संस्था व स्थानिक नागरिक करणार आहेत.