अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, गुरुवारी सकाळी दिल्लीचे समाजकल्याण मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरावर छापा टाकला. तपास यंत्रणा आनंद यांच्या घरासह 9 ठिकाणी तपास करत आहे. हे प्रकरण मनी लाँड्रिंगशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.
यासोबतच मद्य धोरण प्रकरणात ईडीने आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते. केजरीवाल यांनी गुरुवारी ईडीला उत्तर पाठवले. केजरीवाल म्हणाले- ‘ही नोटीस बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे. मी 4 राज्यांतील निवडणूक प्रचारासाठी जाऊ नये, यासाठी भाजपच्या आदेशानुसार ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ईडीने ही नोटीस मागे घ्यावी अशी मागणी केजरीवाल यांनी केलीय. राज कुमार आनंद हे केजरिवाल सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री आहेत. त्यांच्याकडे एससी आणि एसटी, गुरुद्वारा निवडणुका, सहकारी संस्थांची जबाबदारी आहे. ईडीचे पथक दिल्लीच्या सिव्हिल लाइन्स भागातील राज कुमार आनंद यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी पोहोचले. निमलष्करी दलाचे अधिकारी निवासस्थानाबाहेर आणि इतर ठिकाणी तैनात होते.
दरम्यान, दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी माजी मंत्री मनीष सिसोदिया व खासदार संजय सिंह यांना अटक केल्यानंतर ईडीने आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले आहे. त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने दिल्लीतील सरकार चालवण्यासाठी पुढची रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली.