तभा फ्लॅश न्यूज/ बदनापूर : देवगाव येथील संत सेवा नगर तांडा वस्तीसाठी गावठाण विस्ताराची मागणी वेग घेत आहे. स्थानिक नागरिक विनोद मगरे यांनी राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रकांत बावनकुळे यांना निवेदन देऊन ही मागणी तातडीने मंजूर करण्याची विनंती केली आहे.
संत सेवा नगर तांड्यास 1985 साली गट क्रमांक 92 मधील गायरानातून केवळ 20 आर जमीन गावठाणासाठी मंजूर करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दशकांत लोकसंख्येत झालेल्या झपाट्याने वाढीमुळे विद्यमान जागा अपुरी ठरत आहे. सध्या येथे नवीन घरे, रस्ते, वीजपुरवठा, पाणीपुरवठा आदी मूलभूत सुविधा उपलब्ध असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंदिरे, मस्जिद, चर्च, बौद्ध विहार आणि सामाजिक सभागृह यांसारखी सार्वजनिक बांधकामेही उभी राहिली आहेत.
स्थानिकांच्या मते, वाढत्या लोकसंख्येसोबतच सुविधा टिकवण्यासाठी आणि भविष्यातील विकासासाठी गावठाणाचा विस्तार अत्यावश्यक झाला आहे. शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.