शहरात गेल्या वर्षभरात अवैधरित्या गावठी कट्टे वापरुन गोळीबाराच्या घटना सातत्याने वाढत असताना पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी क्राईम बैठकीत याबाबत कडक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने गेल्या दोन दिवसात चार गावठी पिस्टल, ३० जिवंत काडतूस व एक मॅगझिनसह तीन आरोपींना अटक केली आहे.
नांदेड शहर व परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी गावठी कट्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करुन गोळीबाराच्या घटना होत होत्या. वर्षभरात जवळपास सोळा ठिकाणी अशा गावठी कट्यांचा वापर करुन लुटण्याचे, धमकी देण्याचे प्रकार घडत होते.
नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील पोलीस अधिकार्यांच्या क्राईम बैठकीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी याबद्दल चिंता व्यक्त करुन गावठी कट्यांचा शोध व आरोपी शोधण्यासाठी ऑलआऊट सर्च ऑपरेशन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या दोन दिवसात वजिराबाद पोलिसांनी याबाबत महत्वाची कामगिरी केली आहे. पोलीस उपअधीक्षक चंद्रसेन देशमुख, पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, गुन्हे शोध पथकाचे शिवराज जमदडे व त्यांच्या पथकाने या मोहिमेला गती दिली. गर्दीच्या ठिकाणी संशयास्पदरित्या फिरणार्या भोलासिंघ उर्फ हरजितसिंघ उर्फ पोलो चरणसिंघ बावरी रा.एनडी-४१ सिडको यास पोलिसांनी ताब्यात घेतले.
पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी पिस्तूल, सात जिवंत काडतूसे व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली. सदरच्या आरोपीची चौकशी केली असता त्याने इतर तीन गावठी पिस्तूल व काडतूस नांदेड शहरात विक्री केल्याची माहिती समोर आली. त्याने दिलेल्या माहितीनुसार गोविंदनगर भागातील रोशन सुरेश हाळदे तसेच लक्ष्मीनगर भागातील महंमद तौफिक शेख सनदलजी या दोघांना ताब्यात घेतले. हाळदे याच्याकडून एक गावठी रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले तर महंमद तौफिक याच्याकडून एक गावठी पिस्तूल, २३ जिवंत काडतूस व एक रिकामी मॅगझिन जप्त करण्यात आली आहे.
सदरच्या तिन्ही आरोपीकडून चार गावठी पिस्टल, ३० जिवंत काडतूस एक मॅगझिन व गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल असा एक लाख १३ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यातील मुख्य आरोपी भोलासिंघ याने मध्यप्रदेशातील एका गावठी पिस्टलवाल्यांशी संधान साधून ते नांदेडात विक्रीसाठी आणत होता. भोलासिंघने अद्याप किती जणांना असे गावठी कट्टे विकले याची माहिती तसेच ज्याच्याकडून हे कट्टे विकत आणायचा त्याची माहिती घेण्याचे सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी सांगितले. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे पोलीस त्रस्त असताना या कारवाईमुळे अशा गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. वजिराबाद पोलीस ठाण्याच्या टिमचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी कौतूक केले आहे.
h8brtc