पंतप्रधान मंगळवारपासून दोन दिवसांच्या झारखंड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आज, बुधवारी रांची येथील बिरसा मुंडा मेमोरियल पार्क व संग्राहलयाला भेट दिली. बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णनही उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या झारखंड दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी मंगळवारी झारखंडमध्ये पोहोचले आणि त्यांनी मंगळवारी रात्री रांचीमध्ये रोड-शो केला. तर आज, बुधवारी सकाळी भगवान बिरसा मुंडा यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर, पंतप्रधान मोदी भगवान बिरसा मुंडा यांचे जन्मस्थान असलेल्या खुंटी जिल्ह्याला भेट दिली. याठिकाणी 24 हजार कोटी रुपयांच्या लोककल्याणकारी योजनांचे अनावरण प्रस्तावित आहे.. पंतप्रधान मोदी खुंटी जिल्ह्यातील भगवान बिरसा मुंडा यांचे जन्मस्थान असलेल्या उलिहाटू गावालाही भेट देतील आणि तिसर्या आदिवासी गौरव दिन कार्यक्रमातही सहभागी होतील.
पंतप्रधान मोदी ज्या 24 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत ते विशेषत: असुरक्षित आदिवासी वर्गावर केंद्रित आहेत. पंतप्रधान मोदी झारखंडमधूनच ‘विकास भारत संकल्प यात्रा’ सुरू करणार आहेत. याशिवाय पीएम मोदी पीएम किसान योजनेचा 18 हजार कोटी रुपयांचा हप्ताही जारी करतील. राज्यातील 7200 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणीही ते करणार आहेत. झारखंड दिनाबाबत पीएम मोदी म्हणाले, ‘झारखंड हे खनिज उत्खनन तसेच शौर्य, साहस आणि स्वाभिमान यासाठी ओळखले जाते. इथे माझ्या कुटुंबीयांनी देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. मी झारखंडच्या जनतेला स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.
या 24 हजार कोटी रुपयांच्या योजनांतर्गत रस्ते, दूरसंचार संपर्क, वीज, शुद्ध पाणी आणि घरे दिली जाणार आहेत. याशिवाय झारखंडमधील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि पोषणाशी संबंधित योजनाही सुरू केल्या जातील. दुर्गम भागात आदिवासी समुदाय जगापासून अलिप्त राहत असलेल्या भागांवर या योजना लक्ष केंद्रित करतील. पंतप्रधान मोदी आयआयएम रांचीचे नवीन कॅम्पस, आयआयटी-आयएसएम धनबादचे नवीन वसतिगृह, बोकारोमधील पेट्रोलियम तेल डेपो भेट देतील. हातिया-पाकरा, तलगढिया-बोकारो आणि जरंगडीह-पतरतु विभागातील रेल्वे ट्रॅकच्या दुहेरीकरणासारख्या प्रकल्पांचेही ते उद्घाटन करतील.