मुंबई इंडियन्सच्या संघात हार्दिक पांड्याची वापसी झाली आहे. पण त्याबदल्यात मुंबईनं एका अष्टपैलू खेळाडूला रिलीज केलं. त्यानं संघासाठी उत्तम कामगिरी केली होती.
इंडियन प्रीमियर लीगच्या २०२४ हंगामासाठी होणाऱ्या लिलावाआधी संघांनी त्यांच्या रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली. अनेक दिग्गज खेळाडूंची अदलाबदल करण्यात आली. हार्दिक पांड्या आणि कॅमरुन ग्रीन यांच्याबद्दल त्यांच्या संघांनी घेतलेला निर्णय आश्चर्यकारक होता. अनेक चांगले खेळाडू संघांनी रिलीज केले. याचे परिणाम त्या त्या संघांच्या कामगिरीवर होऊ शकतात.
मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात घेणार असल्याची चर्चा होती. अखेर पांड्याची घरवापसी झाली. पण त्यासाठी मुंबईनं कॅमेरुन ग्रीनला रिलीज केलं. गेल्या हंगामात तो मुंबईकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यानं १ शतक आणि २ अर्धशतकं साजरी केली. १६०.२८ च्या स्ट्राईक रेटनं ४५२ धावा चोपल्या. कधीही गियर बदलून फलंदाजी करण्यात तो निपुण आहे. याशिवाय गोलंदाजीही उत्तम करतो. त्याला रिलीज करण्याचा निर्णय संघासाठी घातक ठरू शकतो.
गेल्या ४ ते ५ वर्षांमध्ये हार्दिकचा फिटनेस संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. विश्वचषक स्पर्धेत बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली. त्यानंतर तो उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. त्यामुळे संघाला पाच गोलंदाजांसह खेळावं लागलं. संघाचा समतोल काही प्रमाणात बिघडला. मुंबईच्या संघात परतलेला हार्दिक किती फिट राहतो त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
गुजरात टायटन्स: एक्स फॅक्टरच आऊट
ज्या कर्णधारानं संघाला दोन वर्षांत दोनदा अंतिम फेरीत नेलं, पदार्पणातच जेतेपद मिळवून दिलं, त्यालाच दुसऱ्या संघात पाठवण्याचा निर्णय गुजरातनं घेतला आहे. आता नव्या कर्णधाराच्या नेतृत्त्वात खेळण्याचं आव्हान संघासमोर असेल. एका अष्टपैलू खेळाडूला संघात घ्यावं लागलं. हा निर्णय आव्हानात्मक असेल.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर: हर्षल पटेल आऊट, ग्रीन इन
गेल्या काही हंगामांमध्ये हर्षल पटेलनं आरसीबीसाठी जबरदस्त कामगिरी केली. गेल्या हंगामात त्याच्या नावावर १४ विकेट्स होत्या. त्याआधीच्या हंगामात त्यानं १९ फलंदाजांना तंबूत धाडलं. तर २०२१ मध्ये तब्बल ३२ फलंदाजांना माघारी धाडत पर्पल कॅपचा मानकरी ठरला. हर्षलवर संघानं विश्वास दाखवायला हवा होता. आता आरसीबीची मदार सिराज आणि आकाशदीपवर असेल. दुसरीकडे आरसीबीमध्ये कॅमेरुन ग्रीनची एंट्री झाली आहे. त्याच्यासाठी १७.५ कोटी मोजण्यात आले आहेत. तो गेल्या वर्षीसारखी कामगिरी करेल का याची खात्री देता येत नाही.