राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी 2 नोव्हेंबर रोजी इसिसचा दहशतवादी मोहम्मद शहनावझ आलम याला अटक केलीय. हा दहशतवादी झारखंडच्या हजारीबाग येथील कटकमसंडीच्या न्यू महमूदा हाऊसचा रहिवासी आहे. त्याने बॉम्बस्फोट घडवण्यासाठी विविध भागांची रेकी केल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय.
यासंदर्भात एनआयएच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींशी शाहनवाझ आलमचा थेट संबंध होता. शाहनवाझने बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी विविध ठिकाणांचा शोध घेतला होता. तसेच, त्याने गोळीबार आणि स्फोट घडवून आणण्याबाबत आयोजित प्रशिक्षण शिबिरांमध्ये सक्रिय भूमिका बजावल्याचे तपासात समोर आले आहे.
विशेष म्हणजे, पुण्याच्या कोथरूड परिसरात 19 जुलै 2023 रोजी त्याला महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी यांच्यासह दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना पुणे पोलिसांनी रंगेहात पकडले होते.त्यानंतर तो कोंढवा परिसरातून पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर आरोपी इसिस दहशतवादी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचे समोर आले.एनआयएने त्यांच्यावर 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. या आरोपींनी इसिस दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून देशातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडविण्याचा कट रचल्याचे तपासयंत्रणांनी सांगितले.