पुण्यातील सेनापती बापट रोडवरून चिंचवड गावाच्या दिशेने पीएमपीएल बस जात होती. बसमध्ये जवळपास ५० ते ६० प्रवासी होते. पण अचानकपणे चालक नीलेश सावंत याने बेभानपणे बस चालवून तीन ते चार वाहनांना धडक दिली. आम्हाला वाचावा, बस थांबवा असा आवाज बसमधील प्रवासी देत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या घटनेने माथेफिरू एसटी चालक संतोष मानेच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे पाहण्यास मिळाले. या प्रकरणी आरोपी पीएमपीएल चालकाला चतु:श्रुंगी पोलिसांनी अटक केली असून, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रोडवरील एका सिग्नलवर एमएच १४ एचयू ५७२५ क्रमांकाची पीएमपीएल ही बस चिंचवड गावाकडे प्रवाशांना घेऊन जात होती. त्यावेळी बसचालक नीलेश सावंत याने एका चारचाकी वाहनाला कट मारला. त्या चारचाकी वाहन चालकाने त्याचा जाब आरोपी नीलेश सावंत याला विचारल्यावर रागाच्या भरात बस रिव्हर्स घेऊन त्याने वाहनांना धडक दिली. त्यानंतर पुढील बाजूला असलेल्या काही वाहनांना धडक देऊन काही अंतर बस बेभान घेऊन गेला. नागरिकांनी बस आडवली आणि आरोपी नीलेश सावंत याला पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी आरोपी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीदेखील बस चालविताना शालेय विद्यार्थ्यांसोबत डेक्कन परिसरात आरोपीचा वाद झाला होता. त्यावेळी आरोपीने विद्यार्थ्यांना मारहाण केली होती.