एक आवाज, लाखों एहसास हे इंडियन आयडॉल 14 चे वेधक थीम आहे, जे प्रेक्षकांच्या हृदयात विविध भावना जाग्या करण्याची क्षमता असणाऱ्या जादुई आवाजांवर प्रकाशझोत टाकते. या रियालिटी शोच्या यंदाच्या सत्रात कुमार सानू आणि विशाल दादलानी यांच्यासोबत आघाडीची गायिका, राष्ट्रीय पुरस्कार विजेती श्रेया घोषाल ही देखील परीक्षकांच्या पॅनलवर असणार आहे. या सत्राविषयीची उत्सुकता आणि संगीत क्षेत्रातील आपली वाटचाल याविषयी श्रेयाने हितगुज केले, त्याचा हा अंश-
1. एक गायक म्हणून आत्तापर्यंतचा तुझा प्रवास कसा होता?
खरं सांगायचं तर मी आज जिथे आहे, तिथे कधी पोहोचू शकेन असं मला बिलकुल वाटलं नव्हतं. माझा स्वभाव असा आहे की, मी कधीच योजना आखत नाही संगीत क्षेत्रातील माझा प्रवास देखील नियोजित नव्हता. या मार्गात मला काही असामान्य मार्गदर्शक लाभले. आणि त्यातून मला माझा मार्ग सापडत गेला. हा प्रवास सुंदर आणि सार्थक होता. मला येथे गाण्याची संधी मिळाली आणि माझ्या पात्रतेनुसार यश माझ्या पदरात पडले हे माझे भाग्य आहे. या देशातील उत्तमोत्तम गायक, संगीतकार आणि इतर कलाकारांसोबत गाण्याची संधी मिळल्याचा मला आनंद वाटतो.
2. तुला मिळालेल्या पुरस्कारांविषयी आम्हाला सांग.
जेव्हा जेव्हा मला पुरस्कार मिळाला आहे, तेव्हा माझ्यासाठी तो अनपेक्षित होता. मी म्हटलेले गाणे पुरस्कारासाठी पात्र गाण्यांच्या यादीत असेल अशी माझी अपेक्षा नसतात त्या गाण्यांना पुरस्कार मिळाले आहेत आणि हे पुरस्कार मिळाल्यावर मात्र मला अधिक हुरूप आला आणि आणखी चांगली कामगिरी करण्यासाठीचे बळ मिळाले.
3. एका गायकासाठी शास्त्रीय संगीत शिकणे किती महत्वाचे आहे?
जर तुम्ही भारतीय गायक असाल आणि भारतीय संगीत सादर करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही शास्त्रीय संगीताने सुरुवात केली पाहिजे, जेणे करून एक भक्कम पाया तयार होतो आणि गाण्यात अचूकता येते. संगीत एक अत्यंत प्रगल्भ कला आहे आणि सिने संगीत, जॅझ किंवा कोणत्याही संगीत प्रकारात नाम कमवायचे असेल तर संगीत साधन करावी लागते. भारतीय शास्त्रीय संगीत ही संगीताच्या अवघड धड्यासारखे आहे, जे तुम्हाला तुमच्यात सुधारणा करण्यास मदत करते, मात्र तुम्ही जीव ओतून प्रयत्न केला पाहिजे. संगीत पेशा म्हणून स्वीकारण्याआधी प्रत्येकाने शास्त्रीय संगीताचे धडे घेतले पाहिजेत, असे मला वाटते.
4. गायनाव्यतिरिक्त तुझ्या दिनचर्येत आणखी काय काय असते?
जेव्हा तुम्ही व्यावसायिक गायक असता, तेव्हा त्याचा अर्थ असतो की तुमचे संपूर्ण जीवन गायन आणि रेकॉर्डिंग यासाठी समर्पित असते. पण आता, मी माझ्या मुलासाठी वेळ काढते, कारण आत्ता तो माझी प्राथमिकता आहे. माझे बाळ म्हणजे मला मिळालेली सर्वात सुंदर गोष्ट आहे.
6) तुला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील कोणता पुरस्कार तुझ्या अंतःकरणाच्या विशेष जवळ आहे?
निःसंशयपणे राष्ट्रीय पुरस्काराचे मोल अधिक आहे. एखादा कलाकार जेव्हा जीव ओतून काम करतो, तेव्हा मान्यवर ज्यूरी आणि सरकार यांनी आपल्या कामगिरीची दखल घ्यावी आणि आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा अशी त्याची महत्त्वाकांक्षा असते. हे फक्त हिंदी सिनेसृष्टीसाठीच नाही, तर सर्वच प्रादेशिक चित्रपट आणि मनोरंजन उद्योगात काम करणाऱ्यांना लागू होते. या सर्वांमधून जेव्हा तुमची निवड होते, तेव्हा तो गौरवाचा क्षण असतो.
7) इंडियन आयडॉलमध्ये परीक्षण करण्याबाबत तुला काय वाटते?
इंडियन आयडॉल हा पहिल्यापासून अत्यंत लोकप्रिय शो आहे. या गायन रियालिटी फॉरमॅटने आजवर देशाला अनेक गुणी गायक दिले आहेत, जे संगीत क्षेत्रात लक्षणीय काम करत आहेत. इंडियन आयडॉलच्या चमकदार विश्वात परत येताना मला घरी परतल्याचा आनंद होत आहे. इंडियन आयडॉल ज्युनियरमध्ये मी परीक्षणाचे काम केलेले आहे, पण या शोसाठी ही कामगिरी निभावताना मला आनंद होण्याचे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे सानू दा आणि विशाल यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी या निमित्ताने मला मिळाली आहे. भारतातील प्रतिभेची पुढची फळी शोधून त्यांच्यावर संस्कार करण्याची संधी मिळणे ही खचितच गौरवाची बाब आहे. या कलाकारांना देशातील लोकप्रिय गायक बनताना बघण्यातील आनंद काही औरच आहे. एका रियालिटी शो मधून सुरुवात करून एका प्रचंड लोकप्रिय रियालिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम करण्याचा माझा हा प्रवास खडतर पण सार्थक होता. इंडियन आयडॉलसारखे शोज उगवत्या कलाकारांना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी एक राष्ट्रीय मंच प्रदान करतात आणि संगीत क्षेत्रात कसे काम चालते, याचा अनुभव देतात. मी हा शो आवर्जून बघते. इंडियन आयडॉलच्या या विशेष अपेक्षेने बघितल्या जाणाऱ्या सत्रात आता एक परीक्षक म्हणून वाटचाल करण्यासाठी मी उत्सुक आहे.
8) स्पर्धकांमधून हीरा शोधून काढण्यासाठी तू काय निकष लावणार आहेस?
अनेक उत्तम गायकांमधून एक हीरा शोधून काढणे, ही परीक्षकांवरील मोठी जबाबदारी आहे. गायनातील मूलभूत आवश्यकता म्हणजे भावना, आवाजातील चढ-उतार आणि सूर आणि तालातील अचूकता. त्या पलीकडे जाऊन आम्ही एका अशा आवाजाच्या शोधात आहोत, जो लाखोंमध्ये एक असला पाहिजे आणि आमच्यापुढे आणि लोकांपुढे उठून दिसला पाहिजे. एक परीक्षक म्हणून होतकरू गायकाच्या प्रतिभेवर संस्कार करणे आणि त्याला काही असामान्य परफॉर्मन्स देण्यासाठी सक्षम करणे हे आमचे काम आहे.
9) तुझ्या जीवनातील सर्वात आनंददायक क्षण कोणता होता?
ज्या दिवशी माझा गोड मुलगा माझ्या आयुष्यात आला, तो दिवस! तो सगळ्यात भावनिक आणि सुंदर क्षण होता, जो आयुष्यभर मला आनंद देईल.
10) संगीत क्षेत्राच्या सद्य स्थितीबद्दल तुला काय वाटते?
मला वाटते की, आज-काल या क्षेत्रात येणारे गायक खूप तयारीचे असतात. त्यांनी केवळ संगीताचा अभ्यास केलेला नसतो, तर आपल्या भविष्याचा देखील व्यवस्थित विचार केलेला असतो. कलाकारांना अत्यंत अनुकूल असा हा काळ आहे, याचा मला आनंद वाटतो. आजच्या तंत्रज्ञान प्रेरित जगात विश्वाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून तुम्ही आपला कंटेंट जगभरात प्रसिद्ध करू शकता. सोशल मीडियामुळे संगीत क्षेत्रात तुम्हाला झपाट्याने मान्यता मिळू शकते, जे आजवर तितकेसे सोपे नव्हते. ही तर संगीत क्षत्रातील क्रांतीच म्हटली पाहिजे.
11) तुझ्या मते, एका परीक्षकाची सगळ्यात मोठी जबाबदारी कोणती?
मला वाटते परीक्षकांची सगळ्यात पहिली जबाबदारी म्हणजे स्पर्धकाच्या मनावरील दडपण दूर करणे. पहिल्या दिवशी जे दडपण स्पर्धकांना जाणवते त्याच्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स बिघडू शकतो. तसे होऊ न देण्याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे माझा हा प्रयत्न असतो, की स्पर्धकाला असे वाटले पाहिजे की, पॅनलवर त्यांचे मित्रच बसले आहेत! आपले परीक्षण होत असल्याचे त्यांना जाणवता कामा नये. हे साध्य झाले, तरच ते मोकळ्या मनाने आणि प्रसन्न चित्ताने गाऊ शकतील आणि उत्तम परफॉर्मन्स देऊ शकतील.
बघायला विसरू नका, इंडियन आयडॉल – सीझन 14, या 7 ऑक्टोबरपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!